पानिपत – अब्दालीचे – सवाई माधवसिंगास पत्र

१४ जानेवारी १७६१ रोजी झालेले पानिपतचे युद्ध इतिहासप्रसिद्ध आहे. या युद्धात अहमदशाह अब्दालीच्या अफघानी फौजेने मराठ्यांच्या फौजेचा पराभव केला.

इतिहासात क्वचितच असे पाहायला मिळते की जेत्याने पराजीताच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक उघडपणे राजकीय पत्रात केलेले आहे. आज प्रस्तुत करीत असलेले हे पत्र त्यामुळे महत्वाचे ठरते. पटण्याचे सय्यद हसन अरकारी यांच्या प्रयत्नाने अहमदशाह अब्दाली आणि जयपूरचा राजा सवाई माधवसिंग यांच्यातला पत्रव्यवहार आता उपलब्ध झाला आहे. इ.स. १९४५ च्या इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी दुर्रानी (अब्दाली)-रजपूत संबंधावर निबंध सादर केला होता. तो उपलब्ध आहे. पानिपतच्या युद्धानंतर अब्दालीने जयपूरला पत्र पाठवून युद्धाची हकीकत सांगितली. Modern Review च्या १९४६च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या मुळ पर्शियन पत्राच्या इंग्रजी अनुवादाचा हा मराठी तर्जुमा. (कंसातील उपयुक माहिती स्वयंसंपादित)

अब्दाली लिहितो – …

“पावसाळा होता आणि नदीला(यमुना) पूर आला होता. यामुळे नदी ओलांडून पानिपत आणि कर्नालला पोचणे कठीण होते. शत्रूने(मराठ्यांनी) कुंजपुरा इथे अब्दुस समदखान आणि इतर सरदारांवर हल्ला केला होता (परभूत करून कुंजपुरा ताब्यात घेतले होते). यामुळे आमचे सैन्य शत्रूचा समाचार घेण्याकरिता शाहदऱ्यातून बाहेर पडले. आम्ही यमुना ओलांडली (गौरीपुरा घाटावरून, गुलाबसिंग गुजर या एतद्देशियनेच वाट दाखवली!) आणि खरोन्द्याला पोचलो. तेथे शत्रूने आपले ठाणे (मराठ्यांनी) बसवले होते. आमच्या सैन्याने ते सहज काबीज केले आणि शत्रू पक्षातील सर्वांची कत्तल केली. तेथून आमचे सैन्य पानिपतला पोचले. दक्षिण्यांनी (मराठी मंडळींनी) त्या ठिकाणी मजबूत छावणी कायम केली होती. रोज त्यांच्या आणि आमच्या सैन्यात चकमकी होवु लागल्या. गजिउद्दिन नगरच्या बाहेर गोविंदपंडित (गोविंदपंत बुंदेले – मुळ आडनाव: खेर, आजच्या मध्यप्रदेश मधील सागर संस्थानाचे मुळ पुरुष) ७ हजार सैन्यासह मारला गेला. नंतर आम्ही शत्रूचा चहुबाजूने शत्रूचा कोंडमारा केला. आम्ही त्यांचा रोज पराजय करीत होतो. त्यांच्या छावण्यांवर रोज आगीचा वर्षाव करीत होतो. कित्येकांना यमलोकी पाठवले हे तुम्हाला कळले असेलच.

अखेरीस बुधवारी तोफखाना, घोडदळ, पायदळ घेवून काफरांचे(मराठ्यांचे) सैन्य छावणीतून बाहेर आले. आमच्या गाझींना मारण्याचा त्यांनी निर्धार केला होता. त्यांनी अत्यंत निकराने पुन्हा पुन्हा आमच्या सैन्यावर हल्ले केले. माझ्या दूतांनी मला(अहमदशाहला) ही बातमी सांगितली. गेले दोन-तीन महिने आमची आणि शत्रूची सैन्ये आमने सामने उभी होती. या दरम्यान शत्रूची(मराठ्यांची) फौज रोज येउन आमच्यावर हल्ले करीत. आमच्यावर अनेक हल्ले होत आणि प्रखर युद्धे होवून पराजित झालेलेल शत्रू सैन्य आपल्या छावणीत परत जात असे (अनेकदा अब्दालीचे सैन्यही मार खाऊन गेले होते, परंतु जेता हे मान्य करणे दुर्मिळ). असे नेहमीच सुरु असल्याने आजही तसेच होत असावे असे वाटले.

त्यांच्या हल्ल्याची बातमी येताच त्यांचा मोड करण्यासाठी मी(अब्दाली) घोड्यावर स्वार होवून मैदानात पोहोचलो. तेथे पोचून मी परिस्थितीचे निरीक्षण केले. मला खात्री पटली की शत्रू(मराठे) दोन लाख स्वार, पायदळ, तीरंदाज, जंगी तोफखाना घेऊन निर्णयी प्रबळ चाल करून येत आहे. त्यांच्या सैन्याच्या रांगा एका पाठोपाठ एक ६ कोस दिसत होत्या. पुढे चाल करत ते बंदुकी आणि बाणांचा मारा करत उतावीळ युद्ध करत होते. ते पाहून मी देखील युद्धरचना केली. सैन्याचे मी २ भाग, उजवे आणि डावे असे केले. सैन्याच्या रांगांमागून रंग उभ्या केल्या. मग मी पायदळाच्या बंदुकधारी सरकारी(हुजूर = अब्दालीचा खासगी ?) तोफखान्याला सोबत घेतले व हल्ला केला. माझा वझीर शाहवली खान याला माझ्या पिछाडीवर ठाण मांडून उभे राहावे असा हुकुम केला. वजीर तोफखान्यापाशी पोचताच युद्धाच्या ज्वाला भडकल्या. रणभेरी आणि रणशिंगे यांच्या आवाजाने शत्रूच्या वीरांच्या अंगात स्फुरण चढले. सिंहासारखे शूर वीर शिपाई आणि शक्तिशाली वीर विजेप्रमाणे एकमेकांवर तुटून पडले. त्यांनी गाजवलेले शौर्य यापूर्वी कधीच दृष्टीस पडले नव्हते. रुस्तम आणि इस्फन्दियारसारख्या वीरांनी हे दृश्य पहिले असते तर त्यांनी आश्चर्याने आपली बोटे चावली असती! शत्रूने(मराठ्यांनी) इतके शौर्य दाखवले आणि लढाईची इतकी शर्थ केली की इतरांकडून असे होणे अशक्यच. उभयपक्षातील वीरांचे हात रक्तबंबाळ झाले होते.

युद्धाची सुरुवात तोफा आणि जंबूरकांनी(लहान Mobile तोफा) झाली होती. लवकरच ती शस्त्रे मागे पडून तीर आणि तलवारीचा मारा सुरु झाला. पुढे ती पण मागे सरत शत्रू आणि शूरवीर बर्छे, खंजीर आणि सुरे वापरू लागले. पुढे तर उभयपक्षातील योद्धे बाहुयुद्ध करू लागले. शत्रूने(मराठ्यांनी) लढण्यात कसलीच कसूर सोडली नाही.

परंतु परमेश्वराची कृपा माझ्यावर असल्याने एकाएकी विजयाचे वारे माझ्या दिशेने वाहू लागले. परमेश्वराच्या कृपेने दक्षिणीयांचा पराभव झाला. नानाचा मुलगा विश्वासराव, आणि भाऊ हे वजिराच्या दलासमोर लढत होते. ते मारले गेले. त्यांच्यासोबत अनेक सरदार मारले गेले. इब्राहीमखान गार्दी आणि त्याचा भाऊ पकडले गेले. बापू पंडित (बापुजी महादेव हिंगणे) ही कैदी झाला. शत्रूचे ४०-५० हजार लोक एकाच कत्तलीत ठार झाले. उरलेले पळ काढू लागले. त्यांच्या पाठीवर गेलेल्या पथकांनी १५-२० हजार लोक मारले. मल्हारराव आणि जनकोजीचे काय झाले ते कळलेच नाही. शत्रूचा तोफखाना, हत्ती, घोडे, इतर मालमत्ता हाती सापडली. आता सगळे हिंदुस्थान माझ्या ताब्यात आले आहे. परमेश्वराने दिलेल्या राज्याच्या शत्रूंना आपल्या कर्माची फळे भोगावी लागत आहेत. परमेश्वराच्या कृपेने माझ्या हितचिंतकांच्या आशा आता फलद्रूप होऊ लागल्या आहेत. माझे एकनिष्ठ स्नेही यांनी लाभ घेण्याची वेळ आता आली आहे. तुम्ही एकनिष्ठ आहात असे माझ्या वजिराने मला अनेकदा सांगितले आहे. तुम्ही त्वरित माझ्याकडे आले पाहिजे. या देशाची व्यवस्था करण्याचे मी ठरवले आहे. त्या हेतूने मी सर्व राजे राजवाडे आणि उमराव यांना बोलावले आहे. तुम्ही पण आले पाहिजे, आल्यास परमेश्वर करील तर पहिल्याहून अधिक मानसन्मान आणि वैभव मिळेल”

– X –

अब्दालीने मराठ्यांच्या युद्धकौशल्याचे आणि वीरश्रीचे कौतुक तर केलेच आहे शिवाय आपल्या विजयाचे श्रेय तो केवळ नशिबाला देतो. अब्दालीने पुढे नानासाहेब पेशव्यांनाही पत्र लिहून त्यांच्या पुत्रशोकाबद्दल आणि व्यक्तिगत वैर नसल्याबद्दल लिहिले होते. आगामी काळात आम्ही ते पत्रही वाचकांकरिता उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. तूर्तास मर्यदा.

6 Responses to पानिपत – अब्दालीचे – सवाई माधवसिंगास पत्र

 1. गजानन बंडे says:

  हे सर्व लिहिले आहे,याचा समकालीन पुरावा देता येईल का ?

  Like

 2. Aditya Pandit says:

  Just finished reading Panipat by Sir Vishwasrao Patil and felt that I was standing miles away before reading this book, from one of the greatest historic events in Indian history.
  This letter published by Mr. Pranav Mahajan adds further to my knowledge of Maratha history and I am really grateful to him for the same.

  Like

आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा -

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: