फेब्रुवारी 4, 2016
by Pranav

पुस्तक प्रकाशन सोहळा
नमस्कार वाचकहो !
आपले प्रेम आणि स्नेहाच्या बळावर आम्ही आमचे पुढचे पाऊल दिमाखात टाकले. दि. १९ डिसेंबर २०१५ रोजी राफ्टर पब्लिकेशन्सच्या इतिहासाच्या पाऊलखुणा आणि पेशवाई या दोनीही पुस्तकांचे प्रकाशन झाले. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. सदाशिवराव शिवदे आणि ज्येष्ठ खगोल तज्ञ श्री. मोहनराव आपटे यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन झाले. राफ्टर पब्लिकेशन्स आणि जनसेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम दिमाखात पार पडला. पार्ले टिळक विद्यालय असोसिअशन च्या महादेव लक्ष्मण डहाणूकर महाविद्यालयाच्या केशवराव घैसास सभागृहामध्ये हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. रसिक जाणकार वाचक श्रोत्यांनी कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाऊन नवीन पुस्तकांचे स्वागत केले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे व लेखकांचे गुरु डॉ.सदाशिव शिवदे यांनी तसेच जेष्ठ अभ्यासक श्री.मोहन आपटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रकाशक श्री. उमेश जोशी यांनी ही दोन पुस्तके प्रकाशित करण्यामागची आपली भूमिका मांडली. तसेच पेशवाई चे लेखक श्री. कौस्तुभ कस्तुरे आणि शिवराम कार्लेकर यांनी पेशवे काळातील मोडी पत्रे या विषयावर Presentation दिले. या सर्व प्रकाशन सोहळ्यास उपस्थितांनी उत्तम प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु.अनघा मोडक यांनी उत्तमरित्या केले.

इतिहासाच्या पाऊलखुणा अनावरण

पेशवाई अनावरण

डॉ. शिवदे – आमच्या गुरूंकडून पाठीवर कौतुकाची थाप

ज्येष्ठ खगोल तज्ञ श्री. आपटे सर – चिकित्सक आणि संशोधनात्मक लेखनाचे कौतुक

उपस्थित रसिक वाचकांशी संवाद साधताना राफ्टर पब्लिकेशन्स चे श्री. उमेश जोशी.
उद्घाटनाच्या दिवशी तिथे उपलब्ध असलेल्या सर्व प्रती हातोहात संपल्या हे आपले प्रेम आणि आपुलकी मुळेच शक्य झाले.ब्लॉगच्या निमित्ताने एरवी प्रतिक्रियातून भेटणाऱ्या तुम्हा वाचकांपैकी काही जणांशी प्रत्यक्ष भेटी झाल्या. आपल्याला भेटून आम्हाला आनंद झाला.

आमचा इतिहास मित्र परिवार आणि वाचक वर्ग उपस्थित म्हणजे आनंद द्विगुणीत

श्री बाबासाहेब पुरंदरे यांचे आशीर्वाद
रत्नागिरीतील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे महाराष्ट्रभूषण आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत परंतु त्यांची भेट घेताच त्यांच्या शुभेच्छा व आशीर्वाद मिळाले हे अहोभाग्य! आदरणीय बाबासाहेबांनी मलिक अंबरच्या योगदानाची इतिहासाने दाखल घेतली गेली नसल्याचे आणि त्यामुळे आमचा पाहिलाच लेख खूप आवडल्याचे मनमोकळेपणे सांगितले. आम्ही आमचा अभ्यास पुढे असाच सुरु ठेवावा आणि इतिहासातील लपलेले अनेक दुवे लोकांसमोर आणावे म्हणून शुभेच्छा दिल्या.

साहित्य संमेलनात उत्स्फूर्त प्रतिसाद
पुढे १५ ते १८ जानेवारी दरम्यान पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आपण सर्व इतिहासप्रेमी रसिक वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व दोन्हीही पुस्तकांची प्रकाशकाकडील पहिली आवृत्ती हातोहात संपली.
आपले प्रेम आणि सहयोग असाच मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. इतिहासाच्या पाऊलखुणा या आमच्या ऐतिहासिक लेखसंग्रहाच्या दुसऱ्या खंडाचे कामही लेखकांनी सुरु केले आहे. दोन्हीही पुस्तकांची सुधारित द्वितीय आवृत्तीचे कामही सुरु आहे.
तर सादर करीत आहोत – राफ्टर पब्लिकेशन्स्ची दोन नवीन ऐतिहासिक पुस्तके..
“इतिहासाच्या पाऊलखुणा – मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा” (ऐतिहासिक लेखसंग्रह) –

इतिहासाच्या पाऊलखुणा
आज इतिहास म्हटलं की सर्वसामान्यांना नकोसा झालेला विषय. आधीच शाळेपासून सन-सनावळ्या आणि युद्धांमध्ये गुंतलेला इतिहास सध्या राजकारणी आणि जातियवादी लोकांमूळे जनसामान्यांना अक्षरशः नको वाटू लागला आहे. मग अशातच अनेकांचे फावते आणि इतिहास सोयीसाठी वापरला जातो. अनभिज्ञ तरुणांना न घडलेल्या गोष्टी सांगून पद्धतशीरपणे डिवचले जाते. यामूळेच हे सर्व रोखण्यासाठी विशाल खुळे, प्रणव महाजन, उमेश जोशी, योगेश गायकर, शिवराम कार्लेकर, रोहित पवार आणि कौस्तुभ कस्तुरे या तरुण अभ्यासकांनी आपल्या दैदिप्यमान इतिहासाच्या पाऊलखुणा आणि मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा आपल्या लेखणीने संदर्भासह सजवण्याचा वसा घेतला आणि मग एक अमुल्य लेखसंग्रह सजला तोच “इतिहासाच्या पाऊलखुणा”. सदर लेखसंग्रहात आजपर्यंत मांडल्या गेलेल्या काही घटनांचीच एक वेगळी बाजू आपल्याला पहावयास मिळेल. काही घटना इतिहासकारांच्या ‘दृष्टीकोना’च्या बळी पडल्या, तर काही घटना ‘नजरचूकीने’ राहिलेल्या पुराव्यांवाचून मांडल्या गेल्या. अशा घटानांची संगती लावून, “इतिहासाच्या पाऊलखुणा – मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा” हा ऐतिहासिक साधनांच्या आधारे लिहीलेला लेखसंग्रह राफ्टर पब्लिकेशन्स तर्फे आपल्याला सादर. या लेखसंग्रहात गनिमी काव्याचा प्रणेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलिक अंबर या सिद्दी निजामशाही सरदाराच्या व्यक्तीचित्रापासून ते मराठेशाहीचा कळस म्हणजेच अटकेवर फडकलेला जरीपटका या मोठ्या कालखंडावर लेख आहेत.
“पेशवाई” – महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान –

पेशवाई
पेशवाई म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील जणू एक सुवर्णपानच ! कोकणातील श्रीवर्धन येथून घाटावर आलेल्या बाळाजी विश्वनाथ भट आणि त्यांच्या पुढच्या वंशजांनी स्वराज्यकार्यात आपले आयुष्य झोकून दिले. बाळाजीपंतांनंतर भट घराण्यातील चार पिढयांनी समर्थांच्या “शक्ती-युक्ती जये ठायी” प्रमाणे पराक्रमाला बुद्धीची जोड देत “सिंधू नदीच्या पैलतीरापासून कावेरीच्या दक्षिण तीरापर्यंत सारा मुलुख स्वराज्यात यावा” हे शिवछत्रपतींचे स्वप्न अठराव्या शतकात पूर्ण केले. या पेशवाईचा एक संक्षिप्त आढावा म्हणजे “पेशवाई : महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान” !! कौस्तुभ कस्तुरे लिखित हे पुस्तक राफ्टर पब्लिकेशन्स आपल्यासमोर घेऊन आले आहे. या पुस्तकात शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्यापासून ते शेवटचे पेशवे बाजीराव रघुनाथ इंग्रजांना शरण गेले तोपर्यंतचा कालखंड आणि त्यातील पेशवाईशी निगडीत घटना चितारण्यात आल्या आहेत.

झंझावात
“झंझावात” – मराठ्यांनी महाराष्ट्राबाहेर गाजवलेल्या समशेरीची यशोगाथा –
|| चतुर्थ अवृत्ती लोकार्पण ||
जुलै २०१३ साली प्रकाशीत झालेले झंजावात हे गुरुवर्य निनादराव बेडेकर यांच्या लेखणीतून सिद्ध झालेले ऐतिहासिक पुस्तक. अंधारातील इतिहासातील उजेडात आणणारे बेडेकर यांचे हे लेखन. विस्मृतीत गेलेला महाराष्ट्राबाहेरील मराठी पराक्रमाचा हा इतिहास आहे. मराठी फौजांनी महाराष्ट्राबाहेर केलेल्या अतुलनीय पराक्रमाची ही गाथा आहे. जयपूरला धडक, सूरत मार्गावरील चौक्या, गुजरातेत मराठे, ग्वाल्हेर काबीज, उज्जैन, आमझेरा आदी प्रकरणांमधून तो उलगडत जातो. लाहोर, पेशावर, दिल्ली, जबलपूर, विजापूर, गुलबर्गा, झांशी, जुनागढ, कोटा आदी ठिकाणी मराठ्यांनी गाजवलेल्या अतुलनीय पराक्रमाची सखोल माहिती मिळते.
इतिहासाच्या पाऊलखुणा, पेशवाई या पुस्तकांच्या पहिल्या आवृत्तीतील आणि गुरुवर्य निनादराव बेडेकर लिखित झंझावात या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीतील अगदी काही मोजक्या प्रती सध्या amazon.in वर शिल्लक आहेत ज्या आपण पुस्तकांच्या मुखपृष्ठावर Click करून मागवू शकाल.
बहुत काय लिहीणे ? आमचे अगत्य असु द्यावे.. धन्यवाद !
– लेखक, प्रकाशक आणि मित्रवर्ग –
Like this:
Like Loading...