मलिक-ए-मैदान तोफेतून नाण्यांचा बार

विजापूरच्या शर्या बुरुजावर विराजमान तोफ - मलिक-ए-मैदान

विजापूरच्या शर्या बुरुजावर विराजमान तोफ – मलिक-ए-मैदान

मध्यंतरी सोशल नेटवर्कवर तोफ विषयावर चर्चा करताना प्रश्न आला – तोफेतून गोळ्या व्यतिरिक्त इतर वस्तूंचा बार काढता येतो का? किंवा इतिहासात तश्या काही नोंदी आहेत का?

त्या वेळी मी एक विधान केले होते, की तोफेतून नाणी मारल्याचे वाचनात आले होते. साहजिकपणे माहिती नवीन असल्याने कुणाचाही विश्वास त्यावर बसेना आणि पुरावे देऊन हे सिद्ध करावे असे तज्ञांचे मत होते. मला खात्री होती की हे मी कुठेतरी वाचलेले आहे परंतु नेमके कुठल्या साधनात हे नेमके आठवत नव्हते. गेला सुमारे महिनाभर वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथांचा शोध घेऊन काल अखेर हवी असलेली नोंद मिळाली. सदर घडलेली घटना ही कुठल्या दुसऱ्या – तिसऱ्या तोफेबद्दल घडली नसून भारतातील सर्वात प्रसिद्ध अश्या मलिक-ए-मैदान किंवा मुलुख मैदान तोफेच्या बद्दल घडलेली आहे. १५६५ च्या राक्षसतागडी उर्फ तालीकोटच्या युद्धात हुसेन निजाम शाह यांचा प्रसिद्ध ७०० तोफांचा गाडा लढाईच्या मध्यभागी उभा होता ज्यात ही प्रसिद्ध तोफही उभी होती. राम रायाचे सैन्य वेगाने पुढे, तोफेच्या माऱ्याच्या अलीकडील बाजूस आले. या मुळे उडवलेले सर्व बार हे समोरून आक्रमण करणाऱ्या पायदळ सैन्याच्या पलीकडे पडणार होते. त्यावेळी निजामाचा तोफखान्यावरील प्रसिद्ध अधिकारी चलबी रुमिखान दखनी याला निजामाने हुकुम केला की – “मुलुख मैदान तोफे मध्ये खुर्दा (तांब्याची नाणी) भरून शत्रू म्हणजे राम रायाच्या सैन्यावर उडवावे”. तसे करण्यात आले आणि सुमारे ५००० सैनिक या माऱ्यात मारले गेले. ही घटना त्या युद्धाला कलाटणी देणारी ठरली. तारीख-ए-फिरीश्ता, बसतीन-उस-सलातीन आणि बुर्हान-इ-मासीर या तीनही संदर्भ ग्रंथात ही माहिती आली आहे. त्यांची चित्रे इथे उपलब्ध करीत आहे.

तारीख-ए-फिरीष्ता मधील प्रसंगाचे वर्णन

तारीख-ए-फिरीष्ता मधील प्रसंगाचे वर्णन

 

बुसातीन-उस-सलातीन मधील प्रसंगाचे वर्णन

बुसातीन-उस-सलातीन मधील प्रसंगाचे वर्णन

माझ्यावर विश्वास न ठेवणे हे इतिहास विद्यार्थ्याच्या दृष्टीने योग्यच होते. पोकळ हवेत फैरी झाडण्यापेक्षा ससंदर्भ केलेले विधान हे उचितच असते परंतु समोरच्याला विरोध करताना आपला एखाद्या बाबतीत किती अभ्यास आहे हे तपासणे देखील महत्वाचे असते. कित्येकदा आपल्याला एखादी गोष्ट माहित नाही हेच लोकांना माहित नसते, आणि तुटपुंज्या काही संदर्भाच्या जोरावर केवळ नावाला म्हणून विरोध होतो हा त्यातील गमतीचा भाग.

आभार – तारीख-ए-फिरीष्ता ग्रंथ कुठे मिळेल याची माहिती दिल्याबद्दल श्री. ग.भा. मेहेंदळे सरांचे आभार.

इतिहासाच्या पाऊलखुणा मराठी Podcast – भाग १ – “पालखेडची मोहीम” – १७२८

इतिहास प्रेमी रसिकहो !

नमस्कार,

सादर करीत आहोत नवीन पिढीसमोर इतिहास मांडण्याची एक नवीन पद्धत, एक नवा उपक्रम. इतिहासावर आधारित मराठी पॉडकास्ट “इतिहासाच्या पाऊलखुणा”. दृक-श्राव्य माध्यमातून इतिहास उलगडून दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. दर महिन्याला एक नवीन विषय घेऊन, नकाशे, कागदपत्रे आणि चित्रांचा उपयोग करून इतिहासातील त्या घटनेला उजळणी देण्याचा आमचा हा प्रयत्न असेल. प्रस्तुत आहे भाग पहिला – पालखेडची मोहीम – १७२८.

२४ फेब्रुवारी १७२८ च्या मध्यरात्री थोरले बाजीराव बल्लाळ पेशवे यांनी निजाम-उल-मुल्क यांच्या फौजेला पालखेडच्या रणांगणावर चौतर्फा वेढले आणि सपशेल शरणागती पत्करण्यास भाग पाडले. सादर आहे त्याच पालखेड मोहिमेचा घेतलेला संक्षिप्त परामर्श !

आपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपले प्रेम हाच आमचा खरा खजिना आहे !

आमच्या YouTube Channel ला नक्की Subscribe करा !!

धन्यवाद.

श्री. निनाद बेडेकर – एक अष्टपैलू व्यक्तिमत्व

१० मे २०१६ – आमचे गुरु आदरणीय श्री. निनादराव बेडेकर अर्थात ‘निनादकाका’ आम्हाला सोडून गेले याला एक वर्ष झालं. केवळ एक मार्गदर्शक गुरुच नव्हे तर आयुष्यातील असा दीपस्तंभ आपल्याला सोडून गेला की समुद्रातील हरवलेल्या जहाजाप्रमाणे आपण कसे दिशाहीन होतो याचा अनुभव आम्हाला काका गेल्यानंतर काही दिवस आला. मात्र या धक्क्यातून सावरून पुढे मार्गक्रमण करत राहिले पाहिजे हे आम्हाला निनाद काकांनीच शिकवले आहे. त्यामुळे काकांनी दाखवून दिलेल्या मार्गाने आमचा अभ्यास सुरु आहे. आजही काका आमच्याबरोबर हवे आहेत असे वाटते, पण प्रत्येक क्षणी काका आम्हाला पाहत आहेत याची खात्रीही आहे. काकांनी दाखवलेल्या मार्गावर सदैव चालत राहण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

दिनांक ७ जुलै २०१३ रोजी श्री. निनाद बेडेकर यांच्या “झंझावात” पुस्तकाचे प्रकाशन दिमाखात राफ्टर पब्लिकेशनच्या विद्यमाने झाले होते. त्या प्रसंगी आम्ही तयार केलेली श्री. निनादरावांवरील ही चित्रफीत त्यांच्या प्रथम स्मृती दिनी Upload करत आहोत.

ज्यांचा निनाद रावांशी कधी परिचय झाला नाही, अश्या सर्व इतिहास प्रेमी रसिकांकरिता हा विडीयो त्यांची ओळख करून देईल.

उमेश – विशाल – प्रणव.

शिवभूषण निनादजी बेडेकर – एक आठवण

|| शिवभूषण निनादजी बेडेकर – एक आठवण ||

कविता – निर्धार – कविवर्य कुसुमाग्रज
व्याख्याते – गुरुवर्य शिवभूषण श्री निनादजी बेडेकर


आदरणीय काका,

आज १ वर्ष झाले, तुम्ही आम्हाला सोडून गेलात. आमच्या कुतुहलाचे रुपांतर तुम्ही अभ्यासात करवून घेतले. इतिहासातले जे काय तोडके मोडके बारकावे समजले ते केवळ तुम्ही वाट दाखवलीत म्हणून. सह्याद्रीतील दऱ्या- खोऱ्यातील वाऱ्याला तुम्ही आमच्या साक्षीने बोलते केले. प्रत्येक पैलूचे रहस्य उलगडून दाखवले. तुम्ही दिलेला हा ठेवा आम्ही जतन करणार आहोत. सत्याची कास आम्ही सोडणार नाही आणि तुम्ही दाखवलेल्या रस्त्याने आम्ही चालत राहू .…..

एक नक्की, या वाटचालीतील प्रत्येक पाऊलावर आम्हाला तुमची नेहमीच आठवण येइल.

– विनम्र विद्यार्थी –
प्रणव – विशाल – उमेश

अभ्यास शिवभारताचा – ५ – “महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे”

” महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे ” हे वाक्य समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांसाठी पत्रात लिहले. मनात एक सहज विचार आला महाराष्ट्र शब्द शिवकाळात अजून कुठे मिळतोय का ते पाहूया.योगायोगाने आज शिवकाळातील सर्वात विश्वसनीय मानले जाणारे साधन म्हणजे “शिवभारत” यातील चौथ्या अध्याया मधे महाराष्ट्र हा उल्लेख आज वाचताना मिळाला तो  देत आहे.

image

तैसा शिवाजी नृप जिंकवेना

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या एका वर्षात महाराज किती आघाड्यांवर व्यस्त  होते या संबंधीचा उल्लेख असणारे हे एक पत्र.यातील शिवाजी महाराजांच्या हालचालिंचा नीट विचार केला असता आवाका लक्षात घेण्या सारखा आहे.

image

ब्लॉगच्या निमित्ताने थोडं आमच्याविषयी …

राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या महाद्वारात.

मला नक्की तारीख वार आठवत नाही, कि या मैत्रीला कधी सुरवात झाली. पण आम्ही मात्र मानतो ही मैत्री अंदाजे ३५०/३६० वर्ष जुनी असली पाहिजे म्हणजे अगदी शिवकालापासून…

विशाल आणि मी Orkut वर भेटलो काय, आमची मैत्री झाली काय, अगदी स्वप्नात किंवा एखाद्या चित्रपटात घडत ना अगदी तसच घडत गेलं. पहिल्यांदा विशालची भेट झाली नाही, पण माझ्या नंतरच्या पुणे भेटीच्यावेळी विशाल भेटला आणि ते सुद्धा चक्क भारत इतिहास संशोधक मंडळाच्याइमारतीजवळच ! थट्टेचा भाग बाजूला पण मी, प्रणव आणि विशाल आमचं नेहमीच एकमत असायचं, आम्ही नक्कीच शिवाकालापासुनचे, पेशवेकालापासूनचे मित्र असणार, कदाचित महाराजांच्याच चाकरीत असू एकत्र. भालदार चोपदार आरोळ्या ठोकणारे ! संभाजी महाराजांचे सैनिक असू, किंवा बाजीराव पेशव्यांच्या झंझावाती फौजांमध्ये त्यांच्या सेवेत घोड दौड करणारे शिलेदार, बारगीर…  किंवा गुप्त मसलतीतले हेर ही असु कदाचित… या नव्या (जुन्या) मित्रांना भेटून खूप बर वाटले.

umesh

रायगडावर उमेश

आम्ही एकत्र जमलो की खूप कमी वेळा इतिहासाव्यतिरिक्त गप्पा होत असतं. किंबहुना नाहीच, आम्ही भेटलो की गड, किल्ले, ऐतिहासिक पुस्तक, चांगले संदर्भ ग्रंथ यावरच चर्चा होत असे. कितीही वेळ मिळाला तरी वेळ कमीच पडत असे. त्यावेळी  प्रणव, विशाल पुण्यात चांगल्या ठिकाणी नोकरी करत होते. पुढे २०१२ मध्ये कामातल्या प्राविण्यामुळे प्रणवला अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. माझा स्वतःचा व्यवसाय. तिघांच्याही कामाचा पसारा पाहता आपली हातातली काम टाकून इतिहासाच्या मागे पळायच नाही किंवा तसा आग्रह देखील नाही करायचा असा आमच्यात एक अलिखित  करार झाला होता म्हणा ना… हो पण वेळ असेल तेव्हा मात्र आम्ही तासंतास या गुढ इतिहासाला बोलक करण्यात रमलेलो असतो.

vishu

सिंहगडावर विशाल.

शिवराज्याभिषेक दिनाला रायगडावर काही वर्ष गेलो पण नंतर २००८ सालचा राज्याभिषेक जरा वेगळ्याप्रकारे प्रणवच्या घरी साजरा केला. म्हणजे अगदी एखाद्या अज्ञात शक्तीने घडवून आणावा असा तो प्रसंग होता, म्हणजे अगदी सकाळी ११ पर्यंत काहीच ठरलं नव्हत, मी पण मुंबई मधेच होतो. अचानक ठरलं, आणि मी माझे दोन मित्र राहुल पेठे, प्रियांक आम्ही पुण्याला गेलो, तिकडे विशाल प्रणव यांनी उत्तम व्यवस्था केली. विशाल आणि माझ्या भावाने महाराजांची एक मूर्ती आणली. मग यथासांग पूजा केली, माझ्याकडील शिवराई, प्रणव कडील राजगडावरील छानसे दोन दगड, महाराजांची मूर्ती याला पंचामृताचा अभिषेक घालून पूजा केली. सगळे मिळून १०/१२ जण होतो. महाराजांची सावरकरांनी लिहिलेली आरती म्हटली. मग महाराजांचे घोडदळ, आरमार, हेरखाते, असे लेख वाचन झाल, चर्चा केली. कार्यक्रम आटपून आम्ही रात्री १२ च्या आत मुंबई मध्ये पोचलो होतो. तो दिवस मी कधीच विसरणार नाही. न ठरवता, अचानक आमच्या हातून झालेली महाराजांची सेवा म्हणजे एक अद्वितीय अनुभव होता. इथून आमची मैत्री जी अभेद्य झाली ती आजवर. पुढे २००९ साली पुण्यात राज्याभिषेक उत्सव थोडा मोठ्या प्रमाणावर अथश्री मध्ये भूषण, राहुलस्नेहा, सुधीर या मित्रांच्या सहकार्याने झोकात पार पडला.

आम्ही एकत्र खूप भटकंती देखील केली, सिंहगड, कान्होजी जेधे देशमुखांची कारीवढू, तुळापूर, रायगड, राजगड, लोहगड,रावेरखेडी येथील बाजीरावांची समाधी, पावनखिंड, समुद्री किल्ले तर किती सिंधूदुर्ग, विजयदुर्ग, हिम्मतगड अशा अनेक ठिकाणी भटकलो.

पहिल्यापासून जेष्ठ इतिहास तज्ञ डॉ. सदाशिव शिवदे, आणि श्री.निनाद बेडेकर, महाराष्ट्र भूषण शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले, दुर्मिळ पुस्तक, तसेच संदर्भ ग्रंथ यांनी आम्हला अभ्यासाकरिता वेळोवेळी दिले, त्यामुळे अशा जेष्ठ मार्गदर्शकांच्या सावलीत आमचा अभ्यास सुरु झाला आणि सुरु आहे.

आम्ही वेगवेगळ्या मतांचे, वेगवेगळ्या आवडी-निवडी असूनही या इतिहासाच्या अभ्यासामुळे एकत्र घट्ट बांधले गेलो आहोत. वाद आमच्यातही होतात, पण आमचा एका गोष्टीवर विश्वास आहे ते म्हणजे मैत्री जितकी घट्ट,तितकिच ती समंजस हवी. वाद वगैरे होतीलच पण ते तिथेच सोडून देता आले पाहिजेत. त्यामुळे अभेद्य बुरुजासारखी आमची मैत्री उभी आहे.

ब्लॉग च्या निमित्ताने लेख माला लिहिण्यास सुरवात केली आहे, शिवकाल, शंभुकाळ, पेशवेकाल, असे आणि इतर विभाग बनवून त्यावर अभ्यास पूर्ण लेख लिहिण्यास सुरवात केली आहे. या लेखांतून इतिहासाबद्दल जास्तीत जास्त व अप्रकाशित नवीन माहिती मिळवून काही गैरसमज असतील तर ते दूर करण्याचा प्रामाणिक हेतू/प्रयत्न आहे. ज्ञान वाटल्याने वाढते अस म्हणतात, त्याचा अनुभव घेत होतो.

"समान शीले व्यसनेशु सख्य"

“समान शीले व्यसनेशु सख्य”

पुढे या प्रवासात पुढे आणखी काही सहप्रवासी येऊन मिळाले. कौस्तुभ कस्तुरे, रोहित पवार, योगेश गायकर आणि शिवराम कार्लेकर. खऱ्या अर्थी परिपूर्ण झाल्याचा अनुभव आला. सगळेच सगळ्याच क्षेत्रात जाणकार नसतात एकीची ताकत काय असते याचा अनुभव आला. २०११ मध्ये सुरु केलेल्या माझ्या प्रकाशन संस्थे तर्फे आमच्या ब्लॉगचं आणि आम्हाला या प्रवासात येऊन मिळालेल्या मित्रांच्या लेखांचं “इतिहासाच्या पाऊलखुणा” नावाचं पुस्तक केलं. आणि कौस्तुभचं “पेशवाई” हे पुस्तक प्रकाशित केलं. १६७४ पासून १८१८ पर्यंतचा सर्व कालखंड यात अंतर्भूत केला गेला आहे. वाचकांनी अभ्यासकांनी जाणकारांनी भरपूर कौतुक केलं. दोन्ही पुस्तकांना उत्तम प्रतिसाद मिळाला.

इतिहासाच्या पाऊलखुणा

इतिहासाच्या पाऊलखुणा

वर नावं घेतलेल्या सर्वांचं वर्णन करायचं म्हणजे एक एक स्वतंत्र लेख होईल म्हणून इतकंच सांगतो कि सगळे अभ्यासू उत्तम वाचक आणि पुराव्यांअभावी एक ओळही लिहिणार नाहीत असेच होते. त्यामुळे आमचं गणित जमलं. आता आम्ही सर्वजण एकत्र अभ्यास करतो. चर्चा करतो. प्रसंगी मत मतांतरं येतात तेव्हा वादही घालतो. पण मी म्हणतो तेच खरं असा हट्ट कधीच कोणाचा नसतो. त्यामुळे वाद मागे सोडून पुढील प्रवास सुरु करतो. ही तर सुरवात आहे. अजून बरंच काम करावयाचे आहे. त्यासाठी जाणकार वाचक मार्गदर्शक यांचे आशीर्वाद हवेच आहेत.

दुःखाची एकच आठवण म्हणजे आमचे गुरु जेष्ठ इतिहास संशोधक श्री. निनादराव बेडेकर अर्थात आमचे लाडके निनाद काका १० मे २०१५ रोजी आम्हाला सोडून देवाघरी गेले. आम्ही अक्षरशः पोरके झालो. आमचा दीपस्तंभ हरवला. काकांजवळ घालवलेला एक एक क्षण आम्ही टीपकागद बनून त्यांनी दिलेलं ज्ञान टिपण्यात घालवला आहे. ते क्षण कधीही न विसरण्यासारखे. तरीही न डगमगता काकांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहण्याची शपथ घेऊन आम्ही मार्गस्थ झालो. प्रत्येक्षणी काका आम्हाला पाहत आहेत याची खात्री आहे. त्यामुळे त्यांचे विद्यार्थी म्हणून काकांची मान सदैव अभिमानाने ताठ राहील याची नक्कीच काळजी घेऊ.

मी उमेश तुम्हा वाचकांच ब्लॉग वर स्वागत करतो. लेखांतून काही चुका अढळल्यास पुराव्यानिशी जरूर कळवा त्या वेळोवेळी सूचनांप्रमाणे तपासणी करून, दुरुस्त केल्या जातील.

– आपले विनीत –
उमेश, विशाल

Email : padmadurg@gmail.com
Twitter :@padmadurg 
WordPress Blog Handle : https://raigad.wordpress.com
Direct Access URL : http://www.marathahistory.com

%d bloggers like this: