मलिक-ए-मैदान तोफेतून नाण्यांचा बार

विजापूरच्या शर्या बुरुजावर विराजमान तोफ - मलिक-ए-मैदान

विजापूरच्या शर्या बुरुजावर विराजमान तोफ – मलिक-ए-मैदान

मध्यंतरी सोशल नेटवर्कवर तोफ विषयावर चर्चा करताना प्रश्न आला – तोफेतून गोळ्या व्यतिरिक्त इतर वस्तूंचा बार काढता येतो का? किंवा इतिहासात तश्या काही नोंदी आहेत का?

त्या वेळी मी एक विधान केले होते, की तोफेतून नाणी मारल्याचे वाचनात आले होते. साहजिकपणे माहिती नवीन असल्याने कुणाचाही विश्वास त्यावर बसेना आणि पुरावे देऊन हे सिद्ध करावे असे तज्ञांचे मत होते. मला खात्री होती की हे मी कुठेतरी वाचलेले आहे परंतु नेमके कुठल्या साधनात हे नेमके आठवत नव्हते. गेला सुमारे महिनाभर वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथांचा शोध घेऊन काल अखेर हवी असलेली नोंद मिळाली. सदर घडलेली घटना ही कुठल्या दुसऱ्या – तिसऱ्या तोफेबद्दल घडली नसून भारतातील सर्वात प्रसिद्ध अश्या मलिक-ए-मैदान किंवा मुलुख मैदान तोफेच्या बद्दल घडलेली आहे. १५६५ च्या राक्षसतागडी उर्फ तालीकोटच्या युद्धात हुसेन निजाम शाह यांचा प्रसिद्ध ७०० तोफांचा गाडा लढाईच्या मध्यभागी उभा होता ज्यात ही प्रसिद्ध तोफही उभी होती. राम रायाचे सैन्य वेगाने पुढे, तोफेच्या माऱ्याच्या अलीकडील बाजूस आले. या मुळे उडवलेले सर्व बार हे समोरून आक्रमण करणाऱ्या पायदळ सैन्याच्या पलीकडे पडणार होते. त्यावेळी निजामाचा तोफखान्यावरील प्रसिद्ध अधिकारी चलबी रुमिखान दखनी याला निजामाने हुकुम केला की – “मुलुख मैदान तोफे मध्ये खुर्दा (तांब्याची नाणी) भरून शत्रू म्हणजे राम रायाच्या सैन्यावर उडवावे”. तसे करण्यात आले आणि सुमारे ५००० सैनिक या माऱ्यात मारले गेले. ही घटना त्या युद्धाला कलाटणी देणारी ठरली. तारीख-ए-फिरीश्ता, बसतीन-उस-सलातीन आणि बुर्हान-इ-मासीर या तीनही संदर्भ ग्रंथात ही माहिती आली आहे. त्यांची चित्रे इथे उपलब्ध करीत आहे.

तारीख-ए-फिरीष्ता मधील प्रसंगाचे वर्णन

तारीख-ए-फिरीष्ता मधील प्रसंगाचे वर्णन

 

बुसातीन-उस-सलातीन मधील प्रसंगाचे वर्णन

बुसातीन-उस-सलातीन मधील प्रसंगाचे वर्णन

माझ्यावर विश्वास न ठेवणे हे इतिहास विद्यार्थ्याच्या दृष्टीने योग्यच होते. पोकळ हवेत फैरी झाडण्यापेक्षा ससंदर्भ केलेले विधान हे उचितच असते परंतु समोरच्याला विरोध करताना आपला एखाद्या बाबतीत किती अभ्यास आहे हे तपासणे देखील महत्वाचे असते. कित्येकदा आपल्याला एखादी गोष्ट माहित नाही हेच लोकांना माहित नसते, आणि तुटपुंज्या काही संदर्भाच्या जोरावर केवळ नावाला म्हणून विरोध होतो हा त्यातील गमतीचा भाग.

आभार – तारीख-ए-फिरीष्ता ग्रंथ कुठे मिळेल याची माहिती दिल्याबद्दल श्री. ग.भा. मेहेंदळे सरांचे आभार.

7 Responses to मलिक-ए-मैदान तोफेतून नाण्यांचा बार

  1. shashioak says:

    नमस्कार प्रणव जी,
    आपण म्हणता ते बरोबर आहे. या तहामुळे राजकीय पटावर बाजीरावांचा दबदबा वाढला. या लढाईत पेशव्यांनी सामरिक काय मिळवले होते? निजाम पुन्हा एकदा युद्ध करायला सज्ज व्हायला अवघड जावे यासाठी बाजीरावांनी निजामाच्या सैन्यातील हत्ती, घोडे, अन्य भारवाहक पशू, तोफखाना, गोळे, अन्य शस्त्रे काढून आपल्याकडे घेतली? किती सरदारांच्यापैकी आपल्याकडून लढायला प्रवृत्त केले वगैरे समजून घ्यायला आवडेल.

    Like

    • पेशव्यांनी तसे पहिले तर वय्यकतिकरित्या काहीच मिळवले नाही. बाजीरावांचे या कर्तुत्वामुळे नावलौकिक झाले. मुंगी पैठणच्या तहानुसार १) संभाजीराजांना स्वाधीन करावे २) मराठ्यांचे दक्षिणच्या ६ सुभ्यांवर चौथाईचे हक्क सुरळीत व्हावे आणि ३) चौथाईत बिनहरकत वसुली व्हावी म्हणून नजीकच्या चौक्या स्वाधीन कराव्यात. निजामाने २) व ३) शर्ती पूर्ण केल्या. एव्हाना संभाजी राजे अगोदरच पन्हाळ्याला निघून गेल्याने पहिली मागणी शाहू महाराजांनी स्वतः पूर्ण करावी असे निजामाने सांगितले. सविस्तर माहिती Podcast व इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ मध्ये आपणास वाचावयास मिळेल.

      Like

  2. Shashikant Oak says:

    प्रिय प्रणव, उमेश आणि कौस्तुभ,
    आपले पॉडकास्ट संपूर्ण ऐकले आणि फोटो, पत्रे नकाशे आणि एकमेकांना बोलते करून विषयवस्तु सुंदर सादर केलीत या बद्दल आपले धन्यवाद… हा पॉडकास्ट प्रकार कमी वापरला जातो. मात्रआता आपण आपल्या या उपक्रमात याचा भरपूर वापर करून आम्हाला इतिहासातील अनेक युद्धपातळीवर घटना, कुरघोडी, मराठेशाही वर वर्चस्व मिळवण्यासाठी कोल्हापूर आणि सातारा येथील गादी मधील बंधू बंधूचे वैर, दोन वेगवेगळ्या शस्त्रसंभारने सज्ज असलेल्या फौजा या पार्श्वभूमीवर या पॉडकास्टचे नायक बाजीराव यांनी दाखवलेले परिस्थितीचे, युद्ध नीतीचे आकलन याचा लेखाजोखा ऐकायला आम्रमहोत्सवातील मेजवानीच होती. ही प्रतिक्रिया लिहिताना समोर पुण्याकडून खेळताना धोनी याने अशक्यप्राय विजय ५ सिक्सर्स पैकी शेवटच्या २ बॉल वर मारून मिळवला ! तो अनुभवताना साहस, कल्पकता, शौर्य, आणि परिस्थितीचे आकलन यातून महान व्यक्तींचे नायकत्व सिद्ध होते. हे सर्व प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले!
    अप्रतिम अनुभव…

    Like

    • उमेश जोशी says:

      नमस्कार साहेब. आपली प्रतिक्रिया वाचली. आपल्या सारख्या viewers नी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे आम्हाला नवीन नवीन काम करण्यासाठी हुरूप येतो. आपले मनःपूर्वक धन्यवाद….
      लवकरात लवकर इथून आम्ही आणखी नव्या नव्या विषयांचे podcast प्रकाशित करू…..
      आपले नम्र,
      प्रणव उमेश विशाल कौस्तुभ..!

      Liked by 1 person

      • Shashioak says:

        पुढील भागांसाठी शुभेच्छा…
        एक विचारणा… बाजीरावांच्या विद्युत वेगाने होणाऱ्या हालचालींची पॉडकास्टमधून माहिती मिळाली. साधारणतः पालखेडच्या मोहिमेत किती सैनिक बरोबर होते. टॅक्टिकल बॅटल मधे जरी विजय मिळवला तरी एकंदरीत निजामापेक्षा बरेच कमी मनुष्यबऴ असल्याने निजामाला तहात इतके एकाकी पाडून मानहानीकारक कलमे मान्य करायला लावणे हे यश आहे. तरीही निजामाला खतम करायला का शक्य झाले नाही? यावर आपले विचार वाचायला आवडेल…

        Like

      • धन्यवाद ओक साहेब.
        पालखेडच्या मोहिमेत किती सैनिक बरोबर होते. – निश्चित नोंद उपलब्ध नाही परंतू आजूबाजूच्या नोंदींवरून सुमारे ५० हजार अश्वदल असावे.

        टॅक्टिकल बॅटल मधे जरी विजय मिळवला तरी एकंदरीत निजामापेक्षा बरेच कमी मनुष्यबऴ असल्याने निजामाला तहात इतके एकाकी पाडून मानहानीकारक कलमे मान्य करायला लावणे हे यश आहे. तरीही निजामाला खतम करायला का शक्य झाले नाही? यावर आपले विचार वाचायला आवडेल. –

        दोन बाजू आहेत. आपल्या पहिल्या वाक्यात दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे. निजामाला एकाकी पाडण्यात आले. त्याचे पाणी तुटले जे निकाली ठरले. निजामाचा ऐवजखान नावाचा एक धूर्त सरदार होता ज्याने निजामाला तूर्त हात दगडाखाली आहेत तेव्हा माघार घेऊन बिनशर्त शरणागती घेण्यास सांगितले जे निजामाने केले. निजाम हा दिल्लीच्या बादशाहचाच दक्षिणेवरील नेमलेला अधिकृत सरदार होता आणि दिल्लीकडून खंडित झालेली चौथ आणि सरदेशमुखीची शाश्वती मिळवणे गरजेचे होते आणि कदाचित यामुळेच निजामाचा खात्मा करण्यापेक्षा त्याला शरण आणून आपल्याला हवे असलेले कार्य साध्य करणे पण महत्वाचे होते.

        Liked by 1 person

      • उमेश जोशी says:

        नमस्कार….
        बाजीराव साहेब ह्यांनी जेव्हा सीमोल्लंघन केले तेव्हा त्यांच्या जवळ १०/१५००० अश्वदल असावे. आणि त्यांनी त्यांच्या judgement ने त्यांच्या सरदारांना मोहिमेत मधल्या टप्प्यांवर येऊन मिळावयास सांगितले होते….इथेच राऊ मोठे ठरतात कारण त्यांचे हे अंदाज कधी चुकले नाहीत. अर्थात याला त्यांच्या सक्षम हेर खात्याची जोड होतीच. पण ज्या प्रमाणे नद्या समुद्राला येऊन मिळतात त्या प्रमाणे ह्या सर्व सरदारांच्या फौजा राऊ स्वामींना मिळत गेल्या आणि पालखेड पर्यंत आपली संख्या ६५०००/७०००० च्या घरात गेल्या…. निजामाकडेही भरपूर सैन्य होते आणि तोफखाना होता जो त्याला रस्त्यात (अहमदनगरला) सोडवा लागला….
        “निजामाला खतम करायला का शक्य झाले नाही?” यावर एक वेगळी चर्चा होऊ शकते साहेब. राऊ हे पेशवे होते त्यांच्याकडे सर्वाधिकार नव्हते. छत्रपती शाहू महाराज यांच्या शब्द बाहेर राऊ कधी गेले नाहीत. त्यामुळे निजामाला खतम करण्याचा निर्णय हा राऊ घेणे शक्यच नव्हते. आणि तात्कालिक राजकारण पाहता ते करणे मराठा साम्राज्यासाठी घटकही ठरले असते. आणि बरेच मुद्दे आहेत. कधीतरी चर्चा करू.
        podcast ला दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
        आपले
        उमेश प्रणव विशाल.

        Like

आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा -