गुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण

निनाद गंगाधर बेडेकर….
अर्थात आमचे गुरुवर्य निनाद काका. आज दिनांक १० मे. काकांना जाऊन ठीक २ वर्षे झाली. काकांच्या जाण्याने झालेले आमचे आणि इतिहासाच्या विद्यार्थ्यांचे नुकसान शब्दात मांडणे केवळ अशक्य.
त्यांच्याबरोबर घालवलेल्या एक एक क्षणाची आजही आठवण येते आणि कुठेतरी मनात आज काका आपल्याबरोबर नसल्याची जाणीव होते.
त्यांच्याबरोबर केलेली भटकंती आजही आठवते. काका जाऊन पाहता पाहता दोन वर्षे झाली. त्यांनी शिकवलेल्या अनेक गोष्ठी आजही मनात ताज्या आहेत त्यांच्यामुळे काका आमच्या मनात सदैव होते आहेत आणि पुढेही राहतील. हा इतिहासाचा अभ्यास करताना कसा करावा याबद्दल दिलेले गुरुमंत्र कधीही न विसरण्यासारखे आहेत. केवळ त्यावेळी ऐकलेले त्यांचे ते शब्द आजही आम्हाला अभ्यासाची नवचेतना देतात.
काकांच्या स्मृतीस सादर प्रमाण.

वासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९

आपल्या इतिहासात डोकावून पाहिले असता या मातृभूमीसाठी, देशासाठी मृत्यूला हसत हसत कवटाळणाऱ्यांची परंपरा दिसते. अगदी छत्रपती संभाजी महाराजांनी पापी औरंग्याने दिलेल्या शारीरिक वेदना सहन करत मृत्यूला जवळ केले. त्यांनी एक प्रकारे पुढच्या पिढ्यांना हे उदाहरण घालून दिले की देशापुढे जीवन मृत्यू याचे काहीही मोल नाही असे वाटते. कारण त्यानंतरच्या आपल्या देशाच्या इतिहासात, स्वातंत्र्य लढ्यात अशी उदाहरणे सापडतात. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बाबू गेनू आणि अशी अनेक. त्यातीलच एक नाव चापेकर बंधू. आज दिनांक ८ मे, याच दिवशी १८९९ साली चापेकर बंधूनी मृत्यूला जवळ केले. 22 जून १८९७ हा दिवस इंग्रजांविरुद्ध सुरु असलेल्या लढ्यातला एक महत्वपूर्ण दिवस ठरला. रँड ने पुण्यात प्लेग च्या बहाण्याने अनन्वित अत्याचार केले जे आपल्या कल्पनेपलीकडचे आहेत. अशा या रँडला संपवणे गरजेचे होते. याच दिवशी रँडला पुण्यातील गणेशखिंडीजवळ गाठून त्याच्या बग्गी मध्ये घुसून या बंधूनी त्याचा वध केला.

पुढे चापेकर बंधूना कैद झाली. खटला चालवला गेला अखेर जे व्हायचे तेच झाले. या सर्वांना फाशी ठोठावण्यात आली. ८ मे १८९९ ला वासुदेवराव यांना, १० मे रोजी रानडे यांना, १२ मे ला बाळकृष्णरावांना फाशी देण्याचे नक्की झाले. ७ मे रविवार १८९९ हा दिवस देखील वासुदेवराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नित्य व्यवहार करीत दिवस घालवला. कोणत्याही प्रकारचे मृत्यूचे भय त्यांच्या मनाला शिवले नाही. स्वस्थ झोप घेतली त्या रात्री मात्र १ वाजता उठून प्रार्थना केली. पहाटे पर्यंत प्रार्थना, भगवद्गीतेचे वाचन इत्यादी केले. ७ च्या सुमारास त्यांना वधस्तंभाकडे नेण्याकरिता अधिकारी आले. शेवटपर्यंत हातात ठेवण्यासाठी गीतेची प्रत वासुदेवरावांनी घेतली. नीच इंग्रज अधिकाऱ्यांनी या अखेरच्या क्षणीही त्यांची त्यांच्या वडील बंधूंशी गाठ होणार नाही यासाठी बापूराव यांना कोठडीत डांबून ठेवले गेले. परतू त्यांच्या कोठडीवरून जाताना वासुदेवरावांनी बाहेरूनच “बापू मी जातो”, असे म्हटले. आतूनही “रामराम” असे शब्द आले. वासुदेवरावांना डिवचण्यासाठी ते इंग्रज अधिकारी त्यांच्या नंतर पुढे सगळे संपेल अशा अर्थी काही म्हणाले. त्यावर त्यांनी उत्तर दिले “आम्ही पाच जण फक्त जात आहोत. अजून एकशेपाच बाकी आहेत”. त्यांना वध स्तंभाकडे नेत असताना त्यांचे धैर्य पाहून आणि चेहेर्यावर जराही भय नसलेले पाहून इंग्रज अधिकारी देखील स्तंभित झाले. ठीक ७ च्या ठोक्याला वासुदेवराव चापेकर यांना फाशी देण्यात आली.

देशासाठी स्वातंत्र्यासाठी प्राण समर्पित करणारे स्वातंत्र्यसैनिक होते म्हणून आज आपण हे दिवस पाहू शकत आहोत असे वाटते. आज त्यांचे स्मरण आणि त्याची जाणीव या पिढीला असणे आवश्यक आहे. ८ मे १८९९ रोजी देशासाठी फासावर जाणाऱ्या वासुदेव हरी चापेकर यांची आज पुण्यतिथी. त्यांना त्रिवार प्रणाम……

उमेश जोशी.

#इतिहासाच्या_पाऊलखुणा

#स्वतंत्रते_भगवती

%d bloggers like this: