समरांगण – राक्षसभुवन : १७६३

१७६३ साली निजामला मराठा सैन्याने राक्षसभुवन येथे हरवले. निजामाचे सैन्य विठ्ठल सुन्दर परशुरामींच्या नेतृत्वात लढत होते जे या युद्धात मारले गेले. सूर्योदयानंतर मराठा सैन्याने भर पावसात ही लढाई केली होती. राजनीती, युद्धकला आणि शौर्य ह्यांचा संगम असलेली ही लढाई. सादर आहे आम्ही घेतलेला राक्षसभुवनच्या लढाईचा संक्षिप्त मागोवा !

Please subscribe to our channels –
मराठी चॅनल : https://youtube.com/marathahistory
हिन्दी चॅनल – https://www.youtube.com/virasat
English Channel – https://www.youtube.com/historiography

धन्यवाद !

थोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक

आपल्या २० वर्षांच्या वादळी कारकिर्दीत थोरल्या बाजीराव साहेबांनी काही अचाट धैर्य केली. त्यातील एक होते थेट दिल्लीवर चढाई करणे. १७३७ साली सादतखानावर केलेली ही चढाई इतिहास प्रसिद्ध आहे. ह्या स्वारी बद्दल थेट राउंनीच अप्पांना पत्र लिहून कळवले होते. हे पत्र त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात महत्वपूर्ण ठरावे असेच आहे. पत्रातील एक वाक्य तर कायम स्मरणात रहावे असे आहे, त्यावरून त्या काळातील राजकारणावर भरपूर प्रकाश पडतो – “दिल्ली महास्थळ, अमर्याद केल्यास राजकारणाचा दोर तुटतो”.

इतिहास प्रेमींच्या अभ्यासाकरिता सदर पत्र संपूर्ण उपलब्ध करत आहोत. पत्र जरा लांबलचक आहे परंतु अत्यंत महत्वाचे आहे. त्यातील काही महत्वाचे मुद्दे मुद्दाम अधोरेखित केले आहेत. वाचकांनी हे पत्र जरुर वाचावे.

थोरल्या बाजीरावांचे चिमाजी अप्पांना पत्र

थोरल्या बाजीरावांचे चिमाजी अप्पांना पत्र

प्रतापसूर्य बाजीराव – श्री निनाद बेडेकर यांचे दुर्मिळ व्याख्यान

जेष्ठ इतिहास संशोधक श्री निनाद बेडेकर यांचे प्रतापसूर्य बाजीराव यांच्या चरित्रावर दिलेले हे दुर्मिळ व्याख्यान तुम्हा सर्वांसाठी उपलब्ध करत आहोत. सदर व्याख्यान हे जनसेवा समिती विले पारले, मुंबई यांच्या द्विदशकपूर्ती निमित्त २००८ साली निनाद काकांनी दिले होते. हे व्याख्यान प्रदर्शित करण्याची परवानगी दिल्याबद्दल जनसेवा समितीचे आणि श्री पराग लिमये यांचे खूप खूप आभार.

श्री. निनाद बेडेकर यांच्यासारख्या जेष्ठ इतिहास संशोधकाचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न…!!

आमच्या चॅनलला आपण जरूर सबस्क्राइब करा –
Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UCLTxpUgKms5Yxi-LcOOxTdg

गुलाम कादर जेरबंद

नजीबखान रोहिल्याचा नातू गुलाम कादर हा आपल्या आजोबांप्रमाणेच विकृत मनुष्य होता. त्याने दिल्लीत केलेल्या अमानुष कृत्यांचा पाढा वाचल्यास हा मनुष्य होता कि सैतान असा प्रश्न मनात येतो. बादशाहच्या जनान्याची विटंबना, राजकुमाऱ्यांचे अनन्वित छळ या गुलाम कादर ने केले. या छळाने उच्चांक गाठला जेव्हा गुलाम कादरने बादशाह शाह आलमचे डोळे काढले आणि त्याला अदबखान्यात घातले. महादजी शिंदे यांनी पुढे दिल्लीत येऊन शाह आलमची सुटका केली. एव्हाना गुलाम कादर घौसगडच्या दिशेने पळून गेला होता. मराठ्यांनी त्याचा पिच्छा केला आणि त्याला पकडले. या पकडीचा सविस्तर वाकया मथुरेहुन अप्पाजी राम याने नाना फडणवीस यांना लिहून कळवळा. या वृत्तांतात कादरला कसे पकडले याची सविस्तर नोंद आली आहे. पुढे याच कादरला भयंकर शिक्षा करण्यात आली. त्याने केलेल्या सर्व कृत्यांचे भोग त्याला स्वतः भोगावे लागले. वाचकांच्या अभ्यासाकरिता प्रस्तुत आहे मथुरेहून पाठवलेला हा संपूर्ण वाकया.

गुलाम कादरच्या अटकेचा वाकया

गुलाम कादरच्या अटकेचा वाकया

यस्याश्वा तस्य राज्यं ।

यस्याश्वा तस्य राज्यं ।

यस्याश्वा तस्य राज्यं ।

मध्ययुगीन इतिहासात घोड्यांना अनन्य साधारण महत्व होते. घोड्यांची निगा राखणे, उत्तम जातिवंत घोडी खरेदी करणे हा रोजच्या राजकारणातील एक अविभाज्य घटक होता. खुद्द शिवाजी राजे आपल्या घोड्यांच्या पागेत जाऊन रोज एक श्लोक म्हणत असत असे ९१ कलमी बखरीत नोंद केलेले आहे. –

यस्याश्वा तस्य राज्यं ।
यस्याश्वा तस्य मेदिनी ।
यस्याश्वा तस्य सौख्यं ।
यस्याश्वा तस्य सामराज्यं ।।

एकदा सरसेनापती हंबीरराव यांनी कनकगिरीच्या पाळेगाराकडून  काही शिंगर विकत घेतली होती. वळीवाच्या पावसात ती भिजली. महाराजांना ही बातमी समजताच त्यांनी मुजुमदार अनाजी मलकरे आणि हंबीरराव यांची चांगलीच फजिती केली होती. मुजुमदारांना १२५ होन जमा करायला सांगितले आणि पुढे याच शिंगरांची काळजी घ्यावी आणि त्यावर पागेचा डाग द्यावा म्हणून त्यांनी हुकूमही केला होता.

पानिपतच्या लढाईपूर्वी तमासा नावाच्या संसर्गजन्य रोगाने १० हजार घोडी मृत्युमुखी पडली होती. आजच्या प्रस्तुत नोंदी ह्या पेशवे काळातील यादी असून त्यातून घोड्यांच्या तसेच इतर जनावरांच्या आजारावर कसा इलाज केला जात असे याचे उल्लेख आहेत. उंट माती खाऊ लागल्यास काय करावे, गाई, घोड्याचे पाय मोडल्यास त्याचा इलाज, म्हशीच्या शिंगांचा औषधी उपयोग अश्या अनेक चमत्कारिक नोंदी तुळशीबागवाले दफ्तरात सापडल्या.

पेशवे काळातील घोड्यांच्या इलाजांची नोंद

पेशवे काळातील घोड्यांच्या इलाजांची नोंद

पेशवे काळातील घोड्यांच्या इलाजांची नोंद

पेशवे काळातील घोड्यांच्या इलाजांची नोंद

राजकीय इतिहासाच्या चर्चेत या व्यावहारिक नोंदी इतिहासात कुठेतरी हरवून जातात. त्याच लोकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न.

इतिहासाच्या पाऊलखुणा मराठी Podcast – भाग १ – “पालखेडची मोहीम” – १७२८

इतिहास प्रेमी रसिकहो !

नमस्कार,

सादर करीत आहोत नवीन पिढीसमोर इतिहास मांडण्याची एक नवीन पद्धत, एक नवा उपक्रम. इतिहासावर आधारित मराठी पॉडकास्ट “इतिहासाच्या पाऊलखुणा”. दृक-श्राव्य माध्यमातून इतिहास उलगडून दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. दर महिन्याला एक नवीन विषय घेऊन, नकाशे, कागदपत्रे आणि चित्रांचा उपयोग करून इतिहासातील त्या घटनेला उजळणी देण्याचा आमचा हा प्रयत्न असेल. प्रस्तुत आहे भाग पहिला – पालखेडची मोहीम – १७२८.

२४ फेब्रुवारी १७२८ च्या मध्यरात्री थोरले बाजीराव बल्लाळ पेशवे यांनी निजाम-उल-मुल्क यांच्या फौजेला पालखेडच्या रणांगणावर चौतर्फा वेढले आणि सपशेल शरणागती पत्करण्यास भाग पाडले. सादर आहे त्याच पालखेड मोहिमेचा घेतलेला संक्षिप्त परामर्श !

आपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपले प्रेम हाच आमचा खरा खजिना आहे !

आमच्या YouTube Channel ला नक्की Subscribe करा !!

धन्यवाद.

गोविंदपंत बुंदेले – ‘आम्ही कान धरली शेळी आहो’

गोविंदपंत बुंदेले (मूळ आडनाव खेर) हे मराठ्यांचे उत्तरेतील एक मातबर सरदार होते. छत्रसालाकडून मिळालेल्या बुंदेलखंडातील राज्यावर सुमारे १७३३ दरम्यान त्यांची नियुक्ती झाली असावी. प्रस्तुत पत्र हे एका वेगळ्या अर्थाने इतिहासावर प्रकाश टाकणारे आहे. जातीवरून शिव्यांची लाखोली वाहणारे स्वयंघोषित इतिहासप्रेमी आज ब्राम्हण समाजाला टार्गेट करतात. पेशव्यांनी स्वराज्य बुडवले, मराठा सरदारांना ‘बामण’ पेशवाईत चांगले वागवले गेले नाही असे बिनबुडाचे आरोप करत हिंडतात. हे पत्र २३ सप्टेंबर १६५५ रोजी गोविंदपंत बुन्देल्यांनी नानासाहेब पेशव्यांना लिहिले आहे. उत्तरेतील हकीगत सांगणारे हे पत्र स्पष्ट आणि बोलके आहे. अभ्यासकांनी पत्र निट वाचावे. एका बोलक्या वाक्यात पत्राचा सारांश सांगायचा म्हणजे – “…बख्र-उल्ला खान नावाचा पातशाहीत नामी सरदार होता, त्याला परम संकटात जाऊन, परम उपाय करून (बुंदेले यांनी) बुडवला.… (खंत व्यक्त करताना गोविंदपंत लिहितात) मराठा सरदार हे कर्म करिता तर जमिनीवर न माता (मराठा सरदारांपैकी कुणी हे कार्य केले असते तर त्याला स्वामींनी आभाळात ठेवले असते /  खूप गौरव केला असता) आम्ही स्वामींचे ब्राम्हण आमची शिफारस कोण करणार? (गोंविंदपंत ब्राम्हण म्हणून त्यांच्या पराक्रमाकडे कानाडोळा झाला असे ते लिहितात / त्यांनी कुरा कोडा नावाचे अलाहबाद नजीकचे प्रांत हस्तगत केले होते) “. पुढे अब्दालीच्या तुकडीकडून हेच गोविंदपंत बुंदेले पानिपत संग्रामापूर्वी मारले गेले. अधिक काय लिहावे.

मूळ पत्र संदर्भ – मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ३ (जुना) – लेखांक १३७

गोविंदपंत बुंदेले यांचे नानासाहेब पेशवे यांना लिहिलेले पत्र

गोविंदपंत बुंदेले यांचे पत्र

 

 

 

पानिपत – अब्दालीचे – सवाई माधवसिंगास पत्र

१४ जानेवारी १७६१ रोजी झालेले पानिपतचे युद्ध इतिहासप्रसिद्ध आहे. या युद्धात अहमदशाह अब्दालीच्या अफघानी फौजेने मराठ्यांच्या फौजेचा पराभव केला.

इतिहासात क्वचितच असे पाहायला मिळते की जेत्याने पराजीताच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक उघडपणे राजकीय पत्रात केलेले आहे. आज प्रस्तुत करीत असलेले हे पत्र त्यामुळे महत्वाचे ठरते. पटण्याचे सय्यद हसन अरकारी यांच्या प्रयत्नाने अहमदशाह अब्दाली आणि जयपूरचा राजा सवाई माधवसिंग यांच्यातला पत्रव्यवहार आता उपलब्ध झाला आहे. इ.स. १९४५ च्या इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी दुर्रानी (अब्दाली)-रजपूत संबंधावर निबंध सादर केला होता. तो उपलब्ध आहे. पानिपतच्या युद्धानंतर अब्दालीने जयपूरला पत्र पाठवून युद्धाची हकीकत सांगितली. Modern Review च्या १९४६च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या मुळ पर्शियन पत्राच्या इंग्रजी अनुवादाचा हा मराठी तर्जुमा. (कंसातील उपयुक माहिती स्वयंसंपादित)

अब्दाली लिहितो – …

“पावसाळा होता आणि नदीला(यमुना) पूर आला होता. यामुळे नदी ओलांडून पानिपत आणि कर्नालला पोचणे कठीण होते. शत्रूने(मराठ्यांनी) कुंजपुरा इथे अब्दुस समदखान आणि इतर सरदारांवर हल्ला केला होता (परभूत करून कुंजपुरा ताब्यात घेतले होते). यामुळे आमचे सैन्य शत्रूचा समाचार घेण्याकरिता शाहदऱ्यातून बाहेर पडले. आम्ही यमुना ओलांडली (गौरीपुरा घाटावरून, गुलाबसिंग गुजर या एतद्देशियनेच वाट दाखवली!) आणि खरोन्द्याला पोचलो. तेथे शत्रूने आपले ठाणे (मराठ्यांनी) बसवले होते. आमच्या सैन्याने ते सहज काबीज केले आणि शत्रू पक्षातील सर्वांची कत्तल केली. तेथून आमचे सैन्य पानिपतला पोचले. दक्षिण्यांनी (मराठी मंडळींनी) त्या ठिकाणी मजबूत छावणी कायम केली होती. रोज त्यांच्या आणि आमच्या सैन्यात चकमकी होवु लागल्या. गजिउद्दिन नगरच्या बाहेर गोविंदपंडित (गोविंदपंत बुंदेले – मुळ आडनाव: खेर, आजच्या मध्यप्रदेश मधील सागर संस्थानाचे मुळ पुरुष) ७ हजार सैन्यासह मारला गेला. नंतर आम्ही शत्रूचा चहुबाजूने शत्रूचा कोंडमारा केला. आम्ही त्यांचा रोज पराजय करीत होतो. त्यांच्या छावण्यांवर रोज आगीचा वर्षाव करीत होतो. कित्येकांना यमलोकी पाठवले हे तुम्हाला कळले असेलच.

अखेरीस बुधवारी तोफखाना, घोडदळ, पायदळ घेवून काफरांचे(मराठ्यांचे) सैन्य छावणीतून बाहेर आले. आमच्या गाझींना मारण्याचा त्यांनी निर्धार केला होता. त्यांनी अत्यंत निकराने पुन्हा पुन्हा आमच्या सैन्यावर हल्ले केले. माझ्या दूतांनी मला(अहमदशाहला) ही बातमी सांगितली. गेले दोन-तीन महिने आमची आणि शत्रूची सैन्ये आमने सामने उभी होती. या दरम्यान शत्रूची(मराठ्यांची) फौज रोज येउन आमच्यावर हल्ले करीत. आमच्यावर अनेक हल्ले होत आणि प्रखर युद्धे होवून पराजित झालेलेल शत्रू सैन्य आपल्या छावणीत परत जात असे (अनेकदा अब्दालीचे सैन्यही मार खाऊन गेले होते, परंतु जेता हे मान्य करणे दुर्मिळ). असे नेहमीच सुरु असल्याने आजही तसेच होत असावे असे वाटले.

त्यांच्या हल्ल्याची बातमी येताच त्यांचा मोड करण्यासाठी मी(अब्दाली) घोड्यावर स्वार होवून मैदानात पोहोचलो. तेथे पोचून मी परिस्थितीचे निरीक्षण केले. मला खात्री पटली की शत्रू(मराठे) दोन लाख स्वार, पायदळ, तीरंदाज, जंगी तोफखाना घेऊन निर्णयी प्रबळ चाल करून येत आहे. त्यांच्या सैन्याच्या रांगा एका पाठोपाठ एक ६ कोस दिसत होत्या. पुढे चाल करत ते बंदुकी आणि बाणांचा मारा करत उतावीळ युद्ध करत होते. ते पाहून मी देखील युद्धरचना केली. सैन्याचे मी २ भाग, उजवे आणि डावे असे केले. सैन्याच्या रांगांमागून रंग उभ्या केल्या. मग मी पायदळाच्या बंदुकधारी सरकारी(हुजूर = अब्दालीचा खासगी ?) तोफखान्याला सोबत घेतले व हल्ला केला. माझा वझीर शाहवली खान याला माझ्या पिछाडीवर ठाण मांडून उभे राहावे असा हुकुम केला. वजीर तोफखान्यापाशी पोचताच युद्धाच्या ज्वाला भडकल्या. रणभेरी आणि रणशिंगे यांच्या आवाजाने शत्रूच्या वीरांच्या अंगात स्फुरण चढले. सिंहासारखे शूर वीर शिपाई आणि शक्तिशाली वीर विजेप्रमाणे एकमेकांवर तुटून पडले. त्यांनी गाजवलेले शौर्य यापूर्वी कधीच दृष्टीस पडले नव्हते. रुस्तम आणि इस्फन्दियारसारख्या वीरांनी हे दृश्य पहिले असते तर त्यांनी आश्चर्याने आपली बोटे चावली असती! शत्रूने(मराठ्यांनी) इतके शौर्य दाखवले आणि लढाईची इतकी शर्थ केली की इतरांकडून असे होणे अशक्यच. उभयपक्षातील वीरांचे हात रक्तबंबाळ झाले होते.

युद्धाची सुरुवात तोफा आणि जंबूरकांनी(लहान Mobile तोफा) झाली होती. लवकरच ती शस्त्रे मागे पडून तीर आणि तलवारीचा मारा सुरु झाला. पुढे ती पण मागे सरत शत्रू आणि शूरवीर बर्छे, खंजीर आणि सुरे वापरू लागले. पुढे तर उभयपक्षातील योद्धे बाहुयुद्ध करू लागले. शत्रूने(मराठ्यांनी) लढण्यात कसलीच कसूर सोडली नाही.

परंतु परमेश्वराची कृपा माझ्यावर असल्याने एकाएकी विजयाचे वारे माझ्या दिशेने वाहू लागले. परमेश्वराच्या कृपेने दक्षिणीयांचा पराभव झाला. नानाचा मुलगा विश्वासराव, आणि भाऊ हे वजिराच्या दलासमोर लढत होते. ते मारले गेले. त्यांच्यासोबत अनेक सरदार मारले गेले. इब्राहीमखान गार्दी आणि त्याचा भाऊ पकडले गेले. बापू पंडित (बापुजी महादेव हिंगणे) ही कैदी झाला. शत्रूचे ४०-५० हजार लोक एकाच कत्तलीत ठार झाले. उरलेले पळ काढू लागले. त्यांच्या पाठीवर गेलेल्या पथकांनी १५-२० हजार लोक मारले. मल्हारराव आणि जनकोजीचे काय झाले ते कळलेच नाही. शत्रूचा तोफखाना, हत्ती, घोडे, इतर मालमत्ता हाती सापडली. आता सगळे हिंदुस्थान माझ्या ताब्यात आले आहे. परमेश्वराने दिलेल्या राज्याच्या शत्रूंना आपल्या कर्माची फळे भोगावी लागत आहेत. परमेश्वराच्या कृपेने माझ्या हितचिंतकांच्या आशा आता फलद्रूप होऊ लागल्या आहेत. माझे एकनिष्ठ स्नेही यांनी लाभ घेण्याची वेळ आता आली आहे. तुम्ही एकनिष्ठ आहात असे माझ्या वजिराने मला अनेकदा सांगितले आहे. तुम्ही त्वरित माझ्याकडे आले पाहिजे. या देशाची व्यवस्था करण्याचे मी ठरवले आहे. त्या हेतूने मी सर्व राजे राजवाडे आणि उमराव यांना बोलावले आहे. तुम्ही पण आले पाहिजे, आल्यास परमेश्वर करील तर पहिल्याहून अधिक मानसन्मान आणि वैभव मिळेल”

– X –

अब्दालीने मराठ्यांच्या युद्धकौशल्याचे आणि वीरश्रीचे कौतुक तर केलेच आहे शिवाय आपल्या विजयाचे श्रेय तो केवळ नशिबाला देतो. अब्दालीने पुढे नानासाहेब पेशव्यांनाही पत्र लिहून त्यांच्या पुत्रशोकाबद्दल आणि व्यक्तिगत वैर नसल्याबद्दल लिहिले होते. आगामी काळात आम्ही ते पत्रही वाचकांकरिता उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. तूर्तास मर्यदा.

पानिपत

मराठेशाहीच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या पानिपतावर झालेल्या मराठे आणि अब्दाली यांच्यातील युद्धाच्या २५० व्या स्मृतीदिना निमित्त भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे येथे २०११ साली गुरुवर्य शिवभूषण निनादराव बेडेकरांचे पानिपत या विषयावर ३ दिवस व्याख्यान झाले होते. त्यातील मुख्य भाग येथे सादर प्रस्तुत करीत आहोत.

सत्र १ – पानिपत का झाले ?

सत्र २ – पानिपत कसे झाले ?

सत्र ३ – पानिपतच्या नंतर काय झाले ?


|| गुरुवर्य शिवभूषण निनादराव बेडेकरांच्या पावन स्मृतीस त्रिवार नमन करून सर्व इतिहास अभ्यासकांच्या सोयीकरिता सादर समर्पित ||

 

– विनम्र शिष्य –
विशाल खुळे, प्रणव महाजन व उमेश जोशी
padmadurg@gmail.com

दर्याराज कान्होजी आंग्रे…. “समुद्रावरील शिवाजी”

जेम्स डग्लस यांच्या “Book Of Bombay” पुस्तकातील हा उतारा वाचून सहज लक्षात येते की सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरु केलेल्या आरमाराचा दबदबा किती विलक्षण होता. इंग्रज, फ्रेंच, सिद्दी, मुघल एकेकटे किंवा एकमेकांच्या मदतीने वारंवार कान्होजींना शह देण्याच्या प्रयत्नात होते, आणि कान्होजी त्यांना प्रत्येक वेळी खडे चारत होते. कधी युद्ध करून कधी तह करून कान्होजीनी त्यांना कधीही संपूर्ण विजय मिळू दिला नाही. जेम्स डग्लस ह्यांचा हा उतारा वाचला की हे जलचर कान्होजींना किती वचकून होते हे दिसून येते. फक्त मराठी आरमाराशी लढण्यासाठी त्यांना वेगळी तरतूद करावी लागत असे या वाक्यात इंग्रजांची हतबलता किंवा व्यथा दिसते.

अनेक ठिकाणी कान्होजींच्या सैन्याला “शिवाजीचे सैन्य” संबोधल्याचे उल्लेख आढळतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा तसा होताच….. पुढे छत्रपती शाहू महाराजांचे सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांनी तो दरारा दबदबा समुद्रावर पसरवला. कुठे समकालीन अस्सल पत्रांमध्ये उल्लेख नसला तरी काही जाणकार इतिहास संशोधक मंडळी त्यांना दर्यावारचा शिवाजी म्हणतात. कान्होजी आंग्रे ह्यांचा जीवन पट अभ्यासला तर त्यांना “दर्यावरचे शिवाजी” किंवा “समुद्रावरचे शिवाजी” म्हटले तर काहीही वावगं ठरणार नाही…..!!   Kanhoji

%d bloggers like this: