भगतसिंह यांचे बटुकेश्वर दत्त यांना पत्र

13892030_10154416353378588_1382593773319092255_n

भगतसिंह यांचे बटुकेश्वर दत्त यांना पत्र

सेंट्रल जेल,लाहोर
ऑक्टोबर,1930

प्रिय बंधू,

मला शिक्षा सुनावण्यात आली आहे.तसा फाशीचा आदेश हि देण्यात आला आहे.या कोठड्यामध्ये माझ्या खेरीज फाशीची प्रतीक्षा करणारे आणखी खूप आहेत. ते लोक हीच प्रार्थना करत आहेत की कसेही करून फाशीतून त्यांची सुटका व्हावी.परंतु त्यांच्यात बहुधा मीच एक मात्र असा माणूस आहे,कि जो मोठ्या उत्सुकतेने त्या दिवसाची वाट पाहतोय – जेव्हा आपल्या आदर्शांसाठी फासावर लटकण्याचे भाग्य मला मिळेल.

फाशीच्या तख्तावर मी आनंदाने चढेन आणि आपल्या आदर्शांसाठी क्रांतिकारक किती शौर्याने बलिदान देऊ शकतात ,हे जगाला दाखवून देईन.

मला फाशीची शिक्षा झाली आहे,पण तुला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.तू जिवंत राहशील आणि तुला जिवंत राहून जगाला दाखवून द्यायचे आहे, की क्रांतिकारक आपल्या आदर्शा करिता केवळ मृत्यूला कवटाळतात असेच नव्हे; तर जिवंत राहून प्रत्येक संकटाचा सामनाही करू शकतात.मृत्यू हे खडतर ऐहिक जीवनातून सुटका करून घेण्याचे साधन बनता कामा नये.ज्या क्रांतीकारकांना प्रसंग वषात फाशीच्या फंदातुन सुटका मिळाली आहे त्यांनी जिवंत राहून जगाला हे दाखवून दिले पाहिजे,की ते आपल्या आदर्शासाठी केवळ फासावर चढू शकतात असे नव्हे; तर तुरुंगाच्या अंधाऱ्या कोंदट कोठड्यांमध्ये घुसमटून टाकणाऱ्या क्रूर हीनतम दर्जाच्या अत्याचारांना तोंड देखील देऊ शकतात.

तुझा भगतसिंह

(संदर्भ – शाहिद भगतसिंह समग्र वाड्मय, पृष्ठ – 188)

– विशाल खुळे

बटुकेश्वर दत्त यांचे किशनसिंग यांना पत्र

बटुकेश्वर दत्त यांना  पुढे सालेमच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना कधीही फाशी होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आपली आणि त्यांची अंतिम भेट होऊ शकणार नाही या विवंचनेत बटुकेश्वर होते. भगतसिंग यांना फाशी होईल या भयाने त्यांनी तत्काळ सरकारकडे भगतसिंग यांची एक भेट व्हावी म्हणून अर्ज केला. परंतु त्यांची ही विनंती फेटाळण्यात आली. अतिशय जड अंतःकरणाने बटुकेश्वर दत्त यांनी किशन सिंग यांना पत्र लिहून भगतसिंग यांच्याबद्दल आपल्या मनात असलेल्या भावना व्यक्त केल्या. ते त्यांच्या पत्रात म्हणतात…..

Batukeshwar to kishansingh copy

“माझ्या आयुष्यात आपल्याला पत्र लिहिण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. माझा जिवलग मित्र भाई भगतसिंग याचे दैव अजून ठरायचे आहे. अशा प्रसंगी मी हे पत्र कोणत्या शब्दांनी सुरु करू??? भगतसिंगाचे आणि आपले भावाभावासारखे संबंध आहेत.अशा मैत्रीच्या हृदयातील उसळत्या झऱ्याने भगतसिंगाचे शेवटचे दर्शन मिळावे आणि शेवटची ताटातूट होण्यापूर्वी परस्परास अभिवादन करता यावे, अशी आपण अधिकाऱ्यांना विनंती केली. पण ती अमान्य झाली. तरी तुम्ही माझ्या या भावना भगतसिंगला कळवा.:- बटुकेश्वर दत्त.”

 

बंधुभाव मैत्री काय असते ते या सर्वांकडून शिकावे. भगतसिंग यांची अंतिम भेट होणे आता कठीण आहे हे लक्षात आल्यानंतर होत असलेली तळमळ बटुकेश्वर दत्त यांच्या या पत्रातून जाणवते. देशाला स्वातंत्र्य मिळावे या एकाच उद्देशाने झपाटलेली माणसे एकत्र येतात काय… त्यांच्यात असे बंध निर्माण होतात काय….हे सर्व अनाकलनीय आहे. देशासाठी घरादाराला तिलांजली देऊन या अग्निकुंडात स्वतःला झोकून देणारी ही मंडळी काही वेगळीच. त्यांना कदाचित कल्पना असेलही कि या सर्वाचा शेवट म्हणजे मृत्यू आहे. तरीही न डगमगता प्रसंगी हसत “इन्कलाब झिंदाबाद”च्या घोषणा देत मृत्यूला सामोरे गेलेले हे वीर भारत मातेचे खरे सुपुत्र. या वीरांना प्रणाम….!!

उमेश जोशी.

आम्ही कशासाठी लढत आहोत?

बॉम्ब खटल्यातील दिल्ली सेशन कोर्टात दिलेली ऐतिहासिक जबानी.

(असेम्ब्लीत बॉम्ब फेकल्यानंतर ६ जून १९२९ रोजी दिल्लीचे सेशन जज्ज न्या. लिओनिआ मिडलटन यांच्या कोर्टात सरदार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केलेले ऐतिहासिक निवेदन.)

 

अर्थात हे निवेदन संपूर्ण नाही. या निवेदनातील काही भाग आपल्या सदस्यांसाठी देत आहे. या निवेदनात सरदार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला आहे. सरदार भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांच्या निवेदनातील काही भाग खालील प्रमाणे.

सरदार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त

सरदार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त

“ अथांग सागर रुपी भारतीय मानवतेची ही वर वर दिसणारी शांतता म्हजे कोणत्याही क्षणी उद्भवू शकणाऱ्या एका भीषण तुफानाचे चिन्ह आहे. येणाऱ्या संकटाची परवा न करता बेफाम वेगाने पुढे जाणाऱ्या लोकांसाठी आम्ही फक्त डोक्याची घंटा वाजवली आहे, ‘स्वप्नाळू अहिंसेचे’ युग आता संपले आहे आणि आज उदयाला येणाऱ्या नव्या पिढीला त्या ‘स्वप्नाळू अहिंसेच्या’ व्यर्थतेबद्दल कोणताही संदेह उरलेला नाही, एव्हढेच फक्त आम्ही जनतेला सांगू इच्छितो.

वर आम्ही स्वप्नाळू अहिंसा असं शब्द प्रयोग केला आहे त्याची व्याख्या करणे आवश्यक आहे. आक्रमण करण्याच्या हेतूने ज्या वेळी बळाचा वापर केला जातो. तेव्हा त्याला हिंसा म्हणतात आणि नैतिक दृष्टीकोनातून त्याचे समर्थन करता येत नाही. परंतु जेव्हा एका उचित आदर्शासाठी त्याचा वापर केला जातो, तेव्हा नैतिक दृष्ट्याही ते उचित असते. कोणत्याही परिस्थितीत बलाचा वापर केला जाऊ नये, हा विचार स्वप्नाळू आणि अव्यवहारी आहे. गुरु गोविंदसिंग, छत्रपती शिवाजी, केमाल पाशा, रीजाखान, वॉशिंगटन, लाफायेत, गेरीबल्डी आणि लेनिन यांच्या आदर्शापासून स्फूर्ती घेऊन आणि त्यांच्या पाऊलखुणांवर पाऊल ठेऊनच भारतात उसळणारे हे नवे आंदोलन निर्माण होत आहे………..”

-सरदार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त.

 

त्यांनी त्या वेळी प्रचलित अहिंसेला “स्वप्नाळू अहिंसा” असे संबोधले आहे. आणि त्यांनी तसे का संबोधले आहे त्याचे देखील उत्तर त्याच निवेदनात दिले आहे. हे संपूर्ण निवेदन वाचण्यासारखे आहे. सरदार भगतसिंग यांचा जन्म १९०७ सालचा बटुकेश्वर दत्त यांचा जन्म १९१० सालचा म्हणजे हे निवेदन यांनी दिले तेव्हा यांची वये अनुक्रमे २२ आणि १९ होती. या वयात त्यांच्या मनात काय विचार सुरु होते याचा आरसा म्हणजे हे निवेदन होय. अशी अनेक निवेदने, त्यांच्या जबान्या, त्यांची पत्रे उपलब्ध आहेत. ती वाचताना हेच जाणवते, इतक्या तरुण वयात यांना देश आणि स्वातंत्र्यासमोर काहीही महत्वाचे वाटत नव्हते. या आणि अशा अनेक क्रांतिवीरांनी देशासाठी प्राण वेचले. त्या नाम अनाम वीरांना मानाचा मुजरा….

(संदर्भ: शहीद भगतसिंग : समग्र वाड्मय, पृष्ठ  १३२ ते १३८)

:उमेश जोशी.

%d bloggers like this: