आम्ही कशासाठी लढत आहोत?

बॉम्ब खटल्यातील दिल्ली सेशन कोर्टात दिलेली ऐतिहासिक जबानी.

(असेम्ब्लीत बॉम्ब फेकल्यानंतर ६ जून १९२९ रोजी दिल्लीचे सेशन जज्ज न्या. लिओनिआ मिडलटन यांच्या कोर्टात सरदार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केलेले ऐतिहासिक निवेदन.)

 

अर्थात हे निवेदन संपूर्ण नाही. या निवेदनातील काही भाग आपल्या सदस्यांसाठी देत आहे. या निवेदनात सरदार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला आहे. सरदार भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांच्या निवेदनातील काही भाग खालील प्रमाणे.

सरदार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त

सरदार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त

“ अथांग सागर रुपी भारतीय मानवतेची ही वर वर दिसणारी शांतता म्हजे कोणत्याही क्षणी उद्भवू शकणाऱ्या एका भीषण तुफानाचे चिन्ह आहे. येणाऱ्या संकटाची परवा न करता बेफाम वेगाने पुढे जाणाऱ्या लोकांसाठी आम्ही फक्त डोक्याची घंटा वाजवली आहे, ‘स्वप्नाळू अहिंसेचे’ युग आता संपले आहे आणि आज उदयाला येणाऱ्या नव्या पिढीला त्या ‘स्वप्नाळू अहिंसेच्या’ व्यर्थतेबद्दल कोणताही संदेह उरलेला नाही, एव्हढेच फक्त आम्ही जनतेला सांगू इच्छितो.

वर आम्ही स्वप्नाळू अहिंसा असं शब्द प्रयोग केला आहे त्याची व्याख्या करणे आवश्यक आहे. आक्रमण करण्याच्या हेतूने ज्या वेळी बळाचा वापर केला जातो. तेव्हा त्याला हिंसा म्हणतात आणि नैतिक दृष्टीकोनातून त्याचे समर्थन करता येत नाही. परंतु जेव्हा एका उचित आदर्शासाठी त्याचा वापर केला जातो, तेव्हा नैतिक दृष्ट्याही ते उचित असते. कोणत्याही परिस्थितीत बलाचा वापर केला जाऊ नये, हा विचार स्वप्नाळू आणि अव्यवहारी आहे. गुरु गोविंदसिंग, छत्रपती शिवाजी, केमाल पाशा, रीजाखान, वॉशिंगटन, लाफायेत, गेरीबल्डी आणि लेनिन यांच्या आदर्शापासून स्फूर्ती घेऊन आणि त्यांच्या पाऊलखुणांवर पाऊल ठेऊनच भारतात उसळणारे हे नवे आंदोलन निर्माण होत आहे………..”

-सरदार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त.

 

त्यांनी त्या वेळी प्रचलित अहिंसेला “स्वप्नाळू अहिंसा” असे संबोधले आहे. आणि त्यांनी तसे का संबोधले आहे त्याचे देखील उत्तर त्याच निवेदनात दिले आहे. हे संपूर्ण निवेदन वाचण्यासारखे आहे. सरदार भगतसिंग यांचा जन्म १९०७ सालचा बटुकेश्वर दत्त यांचा जन्म १९१० सालचा म्हणजे हे निवेदन यांनी दिले तेव्हा यांची वये अनुक्रमे २२ आणि १९ होती. या वयात त्यांच्या मनात काय विचार सुरु होते याचा आरसा म्हणजे हे निवेदन होय. अशी अनेक निवेदने, त्यांच्या जबान्या, त्यांची पत्रे उपलब्ध आहेत. ती वाचताना हेच जाणवते, इतक्या तरुण वयात यांना देश आणि स्वातंत्र्यासमोर काहीही महत्वाचे वाटत नव्हते. या आणि अशा अनेक क्रांतिवीरांनी देशासाठी प्राण वेचले. त्या नाम अनाम वीरांना मानाचा मुजरा….

(संदर्भ: शहीद भगतसिंग : समग्र वाड्मय, पृष्ठ  १३२ ते १३८)

:उमेश जोशी.

%d bloggers like this: