मलिक-ए-मैदान तोफेतून नाण्यांचा बार

विजापूरच्या शर्या बुरुजावर विराजमान तोफ - मलिक-ए-मैदान

विजापूरच्या शर्या बुरुजावर विराजमान तोफ – मलिक-ए-मैदान

मध्यंतरी सोशल नेटवर्कवर तोफ विषयावर चर्चा करताना प्रश्न आला – तोफेतून गोळ्या व्यतिरिक्त इतर वस्तूंचा बार काढता येतो का? किंवा इतिहासात तश्या काही नोंदी आहेत का?

त्या वेळी मी एक विधान केले होते, की तोफेतून नाणी मारल्याचे वाचनात आले होते. साहजिकपणे माहिती नवीन असल्याने कुणाचाही विश्वास त्यावर बसेना आणि पुरावे देऊन हे सिद्ध करावे असे तज्ञांचे मत होते. मला खात्री होती की हे मी कुठेतरी वाचलेले आहे परंतु नेमके कुठल्या साधनात हे नेमके आठवत नव्हते. गेला सुमारे महिनाभर वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथांचा शोध घेऊन काल अखेर हवी असलेली नोंद मिळाली. सदर घडलेली घटना ही कुठल्या दुसऱ्या – तिसऱ्या तोफेबद्दल घडली नसून भारतातील सर्वात प्रसिद्ध अश्या मलिक-ए-मैदान किंवा मुलुख मैदान तोफेच्या बद्दल घडलेली आहे. १५६५ च्या राक्षसतागडी उर्फ तालीकोटच्या युद्धात हुसेन निजाम शाह यांचा प्रसिद्ध ७०० तोफांचा गाडा लढाईच्या मध्यभागी उभा होता ज्यात ही प्रसिद्ध तोफही उभी होती. राम रायाचे सैन्य वेगाने पुढे, तोफेच्या माऱ्याच्या अलीकडील बाजूस आले. या मुळे उडवलेले सर्व बार हे समोरून आक्रमण करणाऱ्या पायदळ सैन्याच्या पलीकडे पडणार होते. त्यावेळी निजामाचा तोफखान्यावरील प्रसिद्ध अधिकारी चलबी रुमिखान दखनी याला निजामाने हुकुम केला की – “मुलुख मैदान तोफे मध्ये खुर्दा (तांब्याची नाणी) भरून शत्रू म्हणजे राम रायाच्या सैन्यावर उडवावे”. तसे करण्यात आले आणि सुमारे ५००० सैनिक या माऱ्यात मारले गेले. ही घटना त्या युद्धाला कलाटणी देणारी ठरली. तारीख-ए-फिरीश्ता, बसतीन-उस-सलातीन आणि बुर्हान-इ-मासीर या तीनही संदर्भ ग्रंथात ही माहिती आली आहे. त्यांची चित्रे इथे उपलब्ध करीत आहे.

तारीख-ए-फिरीष्ता मधील प्रसंगाचे वर्णन

तारीख-ए-फिरीष्ता मधील प्रसंगाचे वर्णन

 

बुसातीन-उस-सलातीन मधील प्रसंगाचे वर्णन

बुसातीन-उस-सलातीन मधील प्रसंगाचे वर्णन

माझ्यावर विश्वास न ठेवणे हे इतिहास विद्यार्थ्याच्या दृष्टीने योग्यच होते. पोकळ हवेत फैरी झाडण्यापेक्षा ससंदर्भ केलेले विधान हे उचितच असते परंतु समोरच्याला विरोध करताना आपला एखाद्या बाबतीत किती अभ्यास आहे हे तपासणे देखील महत्वाचे असते. कित्येकदा आपल्याला एखादी गोष्ट माहित नाही हेच लोकांना माहित नसते, आणि तुटपुंज्या काही संदर्भाच्या जोरावर केवळ नावाला म्हणून विरोध होतो हा त्यातील गमतीचा भाग.

आभार – तारीख-ए-फिरीष्ता ग्रंथ कुठे मिळेल याची माहिती दिल्याबद्दल श्री. ग.भा. मेहेंदळे सरांचे आभार.

%d bloggers like this: