आमची नवीन पुस्तके – इतिहासाच्या पाऊलखुणा : भाग २ – शौर्य – पुरंदरे – रणझुंजार
जानेवारी 18, 2017 १ प्रतिक्रिया
मान्यवर रसिकहो !
सप्रेम नमस्कार.
आपल्याला कळवताना आनंद होत आहे की १० डिसेंबर १०२६ रोजी विलेपार्ले, मुंबई येथे राफ्टर पब्लिकेशनच्या विद्यमाने इतिहासाच्या पाऊलखुणा या आमच्या पुस्तकाचा दुसरा भाग प्रकाशित झाला.
त्यासोबत शौर्य, रणझुंजार, पुरंदरे या पुस्तकांचेही प्रकाशन झाले.
सादर आहे प्रकाशन सोहळ्यातील काही क्षणचित्रे –
इतिहासाच्या पाऊलखुणा – भाग २
इतिहास म्हटलं की मराठी माणसाला चटकन काय आठवतं ? अर्थातच मराठ्यांचा मध्ययुगीन इतिहास. पण गेली काही वर्ष या इतिहासाची निर्भत्सना होऊन मूळ इतिहास मागे पडत चालला होता. आणि म्हणूनच, आपल्या या दैदिप्यमान इतिहासाची आठवण रहावी याकरिता खारीचा वाटा उचलत काही अभ्यासकांच्या लेखण्या सरसावल्या, अन त्यातूनच जन्माला आला ‘इतिहासाच्या पाऊलखुणा’ हा एक साधार लेखसंग्रह ! पाऊलखुणाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आपल्यासमोर नविन माहिती आणि काही अपरिचित गोष्टींचा इतिहास समकालीन संदर्भांच्या आधारे या पाऊलखुणाच्या दुसर्या भागात मांडत आहोत. शाहजीराजांपासून मराठेशाहीच्या उत्तरार्धात घडलेल्या ऐतिहासिक घटनांचा साधार मागोवा म्हणजेच ‘इतिहासाच्या पाऊलखुणा – भाग २’
या लिंकवर क्लिक करून आपण हे पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करू शकाल – इतिहासाच्या पाऊलखुणा – भाग २
शौर्य
आपली पुढची पिढी कशी असावी असं वाटतं आपल्याला ? शूर, पराक्रमी, देशावर मनापासून प्रेम करणारी, आव्हानांना भिडणारी, Risk स्विकारणारी, उत्तम नेतृत्वगुण असणारी, चारित्र्यवान, ‘असाध्य, अशक्य, अप्राप्य’ गोष्टी सहज साध्य करून दाखवणारी ! प्रसंगी स्वतःच्या Safety, Dignity, Honour या पलिकडे जाऊन देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदानास तयार असणारी, अन म्हणूनच सार्या देशवासियांच्या आदर आणि प्रेमास पात्र.. हो ना ? अशाच सर्व गुणांनी संपन्न असलेल्या भारतीय सैन्याच्या पराक्रमाची यशोगाथा म्हणजे “शौर्य” ! हुतात्मा कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री वीरमाता श्रीमती अनुराधा गोरे लिखित या पुस्तकात आपल्याला अभिमान वाटेल अशा भारतीय सैन्याचा पराक्रम आपल्याला वाचायला मिळेल.
या लिंकवर क्लिक करून आपण हे पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करू शकाल – शौर्य
पुरंदरे
सतराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्राच्या क्षितिजावर एक नवे घराणे उदयाला येऊ लागले होते. सासवडचे पुरंदरे ! राजाराम महाराजांच्या काळापासून स्वराज्याच्या सेवेत रुजू झालेल्या या घराण्याने अगदी पेशवाईच्या अखेरच्या क्षणापर्यंत स्वराज्याची मनोभावे सेवा केली. कोकणातून वरघाटी आलेल्या बाळाजी विश्वनाथांना प्रथम आसरा मिळाला तो पुरंदर्यांच्याच वाड्यात. प्राप्त होत असलेला पेशवाईचा मान मोठ्या मनाने श्रीवर्धनच्या भटांना दिला पुढे पेशव्यांनीही याचे उपकार म्हणून पुरंदर्यांना सातारा दरबारात मुतालकी आणि सरदारी दिली. अशा या ऐतिहासिक घराण्यातील कर्तबगार पुरुषांची ही कामगिरी. कौस्तुभ कस्तुरे लिखित “पुरंदरे – अठराव्या शतकातील एक कर्तबगार घराणे”. ह्या पुस्तकात अठराव्या शतकात पुरंदरे घराण्याला छत्रपती शाहू महाराजांपासून ते सवाई माधवराव पेशव्यांकडून आलेली अस्सल मोडी इनामपत्रे तसेच त्र्यंबक सदाशिव तथा नाना पुरंदर्यांना आलेली काही महत्वाची पत्रे प्रकाशित करण्यात येत आहेत. सदर मूळ मोडी कागदपत्रांची छायाचित्रेही पुस्तकात समाविष्ट करण्यात आली असून ही सर्व कागदपत्रे आजवर अप्रकाशित होती, ती प्रथमच प्रसिद्ध :होत आहेत.
या लिंकवर क्लिक करून आपण हे पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करू शकाल – पुरंदरे
रणझुंजार
छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द अवघ्या नऊ वर्षांची, पण कळीकाळाला आव्हान देणारी ! काळ्याकुट्ट औरंगरुपी आकाशाला पेलून धरणारी, एका जुलामी झंजावाताला थोपवून धरणारी. नाऊ वर्षे वेगवेगळ्या आघाड्यांवर शत्रूशी कडवी झुंज देणार्या छत्रपती संभाजी महाराजांच्या समशेरीची यशोगाथा म्हणजेच “रणझुंजार”. मरणाला मिठीत घेऊन हौतात्म्य पत्करणार्या ज्वलज्वलनतेजस छत्रपती संभाजी महाराजांच्या युद्धभूमीवरील कर्तृत्वाची गाथा सप्रमाण सिद्ध करणारा डॉ. सदाशिव शिवदे लिखित हा ग्रंथ वाचकांना, अभ्यसकांना निश्चितपणे स्तिमित करेल.
या लिंकवर क्लिक करून आपण हे पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करू शकाल – रणझुंजार
हे सर्व शक्य झाले ते केवळ आपले प्रेम आणि पाठबळाच्या जोरावर !
अधिक काय लिहावे ?
आमुचे अगत्य असो द्यावे !
आपले
प्रणव – विशाल – उमेश