सप्टेंबर 10, 2015
by Pranav
“अवनीमंडळ निरयावनी करावे, यावनाक्रांत राज्य आक्रमावे, हा निघोड चित्ताभिप्राय प्रकट करून पूर्व पश्चिम दक्षिण या प्रांती जे जे यवनस्तोमे बद्धमूल जाहली होती त्यावर सेना समुदाय प्रेरून मारून काढिले.
आपल्या बुद्धिवैभव व पराक्रमे कोणाची गणना न धरिता, कोणावरी चालून जाऊन तुंबळ युद्ध करून रणास आणिले, कोणावरी छापे घातले, कोणामध्ये परस्परे कलह लाऊन दिले, कोणाचे मित्रभेद केले, कोणाचे डेरीयात सिरोन मारामारी केली, कोणासी एकांगी करून पराभविले, कोणासी स्नेह केले, कोणाचे दर्शनास आपणहून गेले, कोणास आपले दर्शनास आणिले, कोणास परस्परे दगे करवले, जे कोणी इतर प्रयत्ने ना कळे त्यांचे देशात जबरदस्तीने स्थळे बांधून पराक्रमे करून आकळीले.
जलादुर्गाश्रयीत होते त्यास नूतन जलदुर्गेच निर्माण करून पराभविले. दुर्गत स्थळी नौका मार्गे प्रवेशले.
ऐसे ज्या ज्या उपाये जो जो शत्रू आकळावा तो तो शत्रू त्या त्या उपाये पादाक्रांत करून साल्हेरी अहिवंतापासून चंजी कावेरीतीरापर्यंत निष्कंटक राज्य, शतावधी कोट किल्ले, तैसीच जलदुर्गे व कित्येक विषम स्थळे हस्तगत केली.
चाळीस हजार पागा साठ-सत्तर हजार शिलेदार, दोन लक्ष पदाती, कोट्यावधी खजिना, तैसेच उत्तम जवाहीर सकल वस्तुजात संपादिले.
९६ कुळीचे मराठीयांचा उद्धार केला. सिंहासनारूढ होवून छत्र धरून छत्रपती म्हणविले, धर्मोद्धार करून देव ब्राह्मण संस्थानी स्थापून यजन याजानादी षटकर्मे वर्णविभागे चालवली.
तस्कारादी अन्यायी यांचे नाव राज्यात नाहीसे केले. देश-दुर्गादी सैन्याचे बंद नवेच निर्माण करून एक रूप अव्याहत शासन चालवले, केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली.की ज्यावर अवरंगजेबासारखा महाशत्रू चालोन आला असता त्यास स्वप्रतापसागरी निमग्न केला. दिगंत विख्यात कीर्ती संपादली … ते हे राज्य“
Like this:
Like Loading...